Stock Market Highlights: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत असतानाच शेअर बाजार आज ग्रीन झोनमध्ये रंगात उघडला. निफ्टीच्या ओपनिंगमध्ये सेन्सेक्स २३० अंकांनी वधारला, तर निफ्टी ७० अंकांनी वधारुन व्यवहार करत होता. निफ्टी बँकेतही जवळपास ३०० अंकांची तेजी दिसून आली. बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टी बँकला आधार मिळत होता.
कालच्या बंदच्या तुलनेत कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स १९४ अंकांनी वधारून ७७,३४९ वर उघडला. निफ्टी ६२ अंकांनी वधारून २३,४११ वर उघडला. बँक निफ्टी १४० अंकांनी वधारून ५०,५१२ वर उघडला.
गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी-फसवणुकीप्रकरणी अमेरिकेच्या न्यायालयात आरोप करण्यात आल्यानंतर बाजारावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. अदानी समूहाचे शेअर्स २६ टक्क्यांनी घसरले. त्यानंतर या समूहासाठी आणखी एक वाईट बातमी आहे, ज्याचा परिणाम बाजारात दिसू शकतो. न्यूयॉर्क न्यायालयाच्या आरोपानंतर केनिया सरकारकडून अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. केनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी विमानतळ आणि वीज करार रद्द केला आहे.
जागतिक बाजारातून संकेत काय?
अमेरिकेच्या बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी डाऊने साडेचारशे अंकांची झेप घेतली, त्यानंतर ४०० अंकांच्या चढउतारानंतर नॅसडॅक ७ अंकांनी वधारून बंद झाला. गिफ्ट निफ्टी शंभर अंकांच्या वाढीसह २३४५० च्या वर होता. डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते आणि निक्केईनं ३०० अंकांची मजबूत कामगिरी दाखवली.
डॉलर निर्देशांक दोन वर्षांच्या उच्चांकी पातळी १०७ च्या वर आला आहे. कच्च्या तेलानं सलग चौथ्या दिवशी २ टक्क्यांनी उसळी घेत ७४ डॉलरवर तर सोनं २० डॉलरनं वधारून २६७५ डॉलरवर पोहोचलं आहे. किंचित घसरणीसह चांदी ३१ डॉलरच्या खाली आली. देशांतर्गत बाजारात सोनं ७०० रुपयांनी वधारून ७६७०० च्या वर बंद झालं.