शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स १६१ अंकांच्या वाढीसह ७७५०२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४६ अंकांच्या वाढीसह २३५८४ अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांमध्ये अमारा राजा बॅटरीज, कृष्णा इन्स्टिट्यूट, कॅप्री ग्लोबल, बोरोसिल, कल्पतरू पॉवर, झोमॅटो आणि त्रिवेणी इंजिनीअरिंग या कंपन्यांचा समावेश होता. तर हॅपिएस्ट माइंड, बंधन बँक, बॉम्बे वर्मा, अॅस्टर डीएम, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, रूट मोबाइल आणि विजया डायग्नोस्टिक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स
एक्साइड इंडस्ट्रीज, टिटागड वॅगन, सुझलॉन एनर्जी, अफल इंडिया आणि अमारा राजा बॅटरीज या कंपन्यांच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ मुदतीत मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांबाबत बोलायचं झालं तर कंटेनर कॉर्पोरेशन, माझगाव डॉक, एनएमडीसी लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, पॉवर ग्रिड, वेस्ट कोस्ट पेपर, एनटीपीसी आणि राइट्स लिमिटेड यांचे शेअर्स वधारले. तर रेलटेल, टॅक्स मेको रेल, इरकॉन इंटरनॅशनलसारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरले.
निफ्टीमध्ये इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि जेके पेपरचे शेअर्स घसरणीवर व्यवहार करत होते, तर टीसीएस आणि एचसीएल टेकचे शेअर्सही किरकोळ घसरण दिसून आली. मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ९ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते, तर अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
प्री ओपन मार्केटची स्थिती
चालू व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी बीएसई सेन्सेक्स प्री-ओपन मार्केटमध्ये ७७,५५३ अंकांवर उघडला, तर निफ्टी ७६ अंकांनी घसरून २३४६१ अंकांवर कामकाज करत होता. शेअर बाजाराचं कामकाज तेजीनं सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून देण्यात आले होते. आशियाई शेअर बाजारात मंगळवारी संमिश्र कल पाहायला मिळाले. बँकांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी आल्यानं सोमवारी बेंचमार्क निर्देशांक तेजीसह बंद झाले.