शेअर बाजारात मंगळवारी उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बीएसई सेन्सेक्स 482 अंकांच्या वाढीसह 71555 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 127 अंकांच्या वाढीसह 21743 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात मंगळवारी दिवसभरातील व्यवहार तेजीत राहिले. निफ्टी बँक निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत होता.
आयशर मोटर्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्याचा करानंतरचा नफा 34 टक्क्यांनी वाढून 996 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. आयशर मोटर्सच्या तिमाही निकालांनी शेअर बाजाराचे अंदाज मागे टाकले.
मंगळवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात चांगली गती दिसून आली आणि खासगी बँकिंग शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीसह, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये वाढ नोंदवली गेली. निफ्टी ऑटो निर्देशांक किंचित घसरणीसह बंद झाला.
हे शेअर्स वधारले / घसरले
शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल बोलायचं झालं तर त्यात कोल इंडिया, यूपीएल, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ आणि विप्रोच्या शेअर्सचा समावेश होता. तर शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये हिंदाल्को, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा. डिविज लॅब, बीपीसीएल आणि टायटनचा समावेश होता. व्हॉल्यूमच्या बाबतीत शेअर बाजारातील व्यवहाराबद्दल बोलायचे झाल्यास, हिंदाल्को, कोल इंडिया, आयशर मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, यूपीएल आणि एसबीआय लाइफ यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूम दिसून आला आहे.
अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. पेटीएम, ओरिएंट इलेक्ट्रिक, राजेश एक्सपोर्ट, पॉलीप्लेक्स, विनती ऑरगॅनिक्स, दीपक फर्टिलायझर्स आणि वेदांत फॅशन यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत.
पेटीएम आपटला
मंगळवारी भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी पेटीएमच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आणि शेअर 42.20 रुपयांनी घसरून 380 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. गौतम अदानी समूहाच्या 10 लिस्टेड कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे शेअर किरकोळ वाढीसह बंद झाले. तर ACC लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस आणि अदानी एनर्जी सोल्यूशनच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.