Stock Market : महिन्याभरापासून घसरणाऱ्या शेअर बाजाराला अखेर ब्रेक लागला. मंगळवारच्या व्यापार सत्रात बाजार वाढीसह बंद झाला. मात्र, दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स १००० अंकांनी आणि निफ्टी ३०० अंकांनी घसरला. बाजाराने दिवसभरात केलेला मोठा नफा शेवटच्या तासात गमावला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स २४० अंकांच्या उसळीसह ७७,५७८ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६५ अंकांच्या उसळीसह २३,५१८ अंकांवर बंद झाला.
या शेअर्समध्ये चढउतार
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १७ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १३ शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २३ शेअर्स वाढीसह आणि २७ तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ३.०७ टक्के, टेक महिंद्रा १.९० टक्के, एचडीएफसी बँक १.८२ टक्के, टायटन १.५८ टक्के, सन फार्मा १.४६ टक्के, टाटा मोटर्स १.३४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.०७ टक्के, पॉवर ग्रिड ०.७७ टक्के, इन्फोसिस ०.६६ टक्के, अदानी पोर्ट्स ०.५९ टक्के वाढीसह बंद झाले. तर रिलायन्स १.८३ टक्के, एसबीआय १.४३ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.२१ टक्के, मारुती १.२० टक्के, टाटा स्टील १.१७ टक्के, भारती एअरटेल ०.९८ टक्के घसरणीसह बंद झाले.
कुठल्या क्षेत्रात झाली वाढ?
आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले. तर तेल आणि वायू, कमोडिटीज, एनर्जी, मेटल आणि पीएसयू बँक समभागांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आजच्या सत्रात निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक ५०३ अंकांच्या उसळीसह ५४,५४८ वर बंद झाला तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक १७० अंकांच्या उसळीसह बंद झाला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप ४३०.३९ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४२९.०८ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. याचा अर्थ आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.३१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, दिवसभरात बाजार प्रचंड वेगाने व्यवहार करत असताना गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ नोंदवली होती.