Stock Market Closing On 17 September 2024: गेल्या दोनतीन दिवसाच्या उच्चांकी उसळीनंतर भारतीय शेअर बाजाराची आज थंड सुरुवात झाली. अमेरिकेतील फेडरल बँकेची व्याजदरांबाबत २ दिवसीय बैठक सुरू होणार आहे. या बैठकीचा परिणाम आज शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. बैठकीपूर्वी भारतीय शेअर बाजारात फारच मर्यादित व्यापार दिसून आला. मात्र, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि बँकिंग शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप इंडेक्स घसरणीसह बंद झाले. बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 90 अंकांच्या उसळीसह 83,080 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 35 अंकांच्या उसळीसह 25,418 अंकांवर बंद झाला. आज काही शेअर्समध्ये तेजी तर काहींमध्ये घसरण पाहायला मिळाली.
गुंतवणूकदारांचे किरकोळ नुकसान
मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या घसरणीमुळे मार्केट कॅप किंचित घसरणीसह बंद झाले. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप ४७०.२१ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात ४७०.४७ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २६ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
चढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 वाढीसह तर 15 तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह आणि 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले. बीएसईवर 4058 शेअर्सचे व्यवहार झाले, ज्यामध्ये 1712 शेअर्स वाढीसह आणि 2237 तोट्यासह बंद झाले आणि 109 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
फेडरल बँकेचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होणार
अमेरिकेची प्रमुख बँक असलेल्या फेडरलची व्याजरदराबाबत बैठक पार पडणार आहे. यापूर्वी फेडरल व्याजदरात कपात करण्याची शक्यता निर्माण झाल्याने भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले. जर फेडरलने व्याजदरात कपात केली तर ही गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.