Join us

युद्धाच्या भीतीने टेन्शन, सोमवारी सेन्सेक्स ८४५ अंकांनी घसरला; बँकिंग, रिअल्टी क्षेत्रांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 9:04 AM

इस्रायल-हमास युद्धानंतर आता इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील वाढलेल्या तणावाचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून आला.

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी सेन्सेक्स ८४५ अंकांनी घसरून ७३,३९९ वर स्थिरावला. इस्रायल-हमास युद्धानंतर आता इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील वाढलेल्या तणावाचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. युद्धाच्या चिंतेमुुळे निफ्टीही २४६ अंकांच्या घसरणीनंतर २२,२७२ अंकांवर बंद झाला.  

सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ३ शेअर्समध्ये वाढ दिसून आली तर २७ शेअर्स घसरले. शुक्रवारी बाजारात घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स ७९३ अंकांनी घसरून ७४,२४४ अंकांवर तर निफ्टी २३४ अंकांनी घसरून २२,५१९ वर स्थिरावला होता. सोमवारी सर्वच क्षेत्रामध्ये विक्रीचा जोर दिसला. बँकिंग, रिअल्टी, मीडिया या क्षेत्रातील शेअर्स दोन टक्क्यांपेक्षा अधिक घसरले. ऑटो, मेटल, फार्मा, ऑईल आणि गॅस यांचेही शेअर्स एक ते दोन टक्क्यांनी कमजोर झाले. आशियायी बाजारांत घसरणीनंतर भारतीय बाजारातही दिसून आले. 

५ लाख कोटींचा फटका 

इस्रायलने इराणवर जोरदार प्रतिहल्ला केल्याने गुंतवणूकदारांमध्ये धास्ती वाढली. नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण भांडवली मूल्य ५ लाख कोटींनी घटून ३९३.६८ लाख कोटींवर आले. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे.   

घसरणीमागची कारणे 

  • इराण आणि इस्रायल या देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची भीती
  • बाजारातील वृद्धिनंतर काही गुंतवणूकदारांनी नफावसुलीसाठी केलेले प्रयत्न; जागतिक बाजारांमध्येही घसरणीचे चित्र  

२,२७५ शेअर्समध्ये घसरण 

  • दिवसभराच्या व्यवहारात २,८११ शेअर्सचे ट्रेडिंग झाले. यातील ४०३ शेअर्समध्ये वाढ झाली तर २,२७५ शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
  • ५७ शेअर्स वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर व्यवहार करताना दिसले तर १६ शेअर्स नीचांकी पातळीवर राहिले; ८६ शेअर्सना अपर सर्किट लागले तर १५१ शेअर्सना लोअर सर्किट लागले.
टॅग्स :शेअर बाजार