Share Market : शुक्रवारी, 6 ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. शुक्रवारी सेन्सेक्सने 364 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी 19,650 अंकांच्या पार बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर सध्याच्या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बाजारातील तेजीला आधार मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सचे निर्देशांकही अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. क्षेत्रीय निर्देशांकात दूरसंचार वगळता इतर शेअर्स वाढीसह बंद झाले.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 364.06 अंकांनी किंवा 0.55 टक्क्यांनी वाढून 65,995.63 अंकांवर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 107.75 अंकांच्या किंवा 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 19,653.50 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी वाढून 319.84 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे गुरुवारी 317.84 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 2 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी
सेन्सेक्समध्ये असलेले 30 पैकी 23 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 5.86 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर बजाज फायनान्स, टायटन, इंडसइंड बँक आणि आयटीसीचे शेअर्स 1.42 टक्के ते 3.83 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
तर उर्वरित 7 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी हिंदुस्तान युनिलिव्हरचा (एचयूएल) शेअर 0.93 टक्क्यांनी घसरला. याशिवाय एशियन पेंट्स, भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 0.11 ते 0.37 टक्क्यांची घसरण दिसून आली.
RBIच्या निर्णयानंतर सेन्सेक्स ३६४ अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २ लाख कोटींची वाढ
शुक्रवारी, 6 ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:38 PM2023-10-06T16:38:52+5:302023-10-06T16:39:03+5:30