Join us  

तीन दिवसांत Sensex ४६१४ अंकांनी उसळला, ₹२८६५७४२३६००००० नं वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 12:31 PM

Share Market Investors Huge Profit : शेअर बाजारातील तीन दिवसांच्या तेजीमुळे शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. जाणून घ्या काय आहे या तेजीमागील कारण.

Share Market Investors Huge Profit : शेअर बाजारातील तीन दिवसांच्या तेजीमुळे शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २८.६५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्स ४,६१४.३१ अंकांनी वधारून विक्रमी उच्चांक गाठला. निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्यानं मंगळवारी बाजारात सुमारे सहा टक्क्यांची घसरण झाली. मात्र त्यानंतर शेअर बाजारात ही जोरदार उसळी आली. मंगळवारी एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या भांडवलात ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली. मात्र, दुसऱ्याच दिवशी बाजारानं जोरदार पुनरागमन केलं आणि शुक्रवारपर्यंत तेजी कायम राहिली. 

शेअर बाजारातील उल्लेखनीय सुधारणांमुळे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये २८,६५,७४२.३६ कोटी रुपयांनी वाढून ४,२३,४९,४४७.६३ कोटी रुपये (५.०८ ट्रिलियन डॉलर) झालं. 

शुक्रवारी बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १,७२०.८ अंकांनी म्हणजेच २.२९ टक्क्यांनी वधारून ७६,७९५.३१ अंकांवर पोहोचला. मागील सत्राच्या तुलनेत १,६१८.८५ अंकांनी म्हणजेच २.१६ टक्क्यांनी वाढून ७६,६९३.३६ च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर स्थिरावला. 

शेअर बाजारात तेजी का ? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) शुक्रवारी आपला रेपो रेट अपेक्षेनुसार ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मजबूत आर्थिक विकासादरम्यान महागाईवर मध्यवर्ती बँकेचे लक्ष आहे. यामुळे नव्या मोदी सरकारला सुधारणांना वाव मिळण्याची शक्यता आहे. "केंद्रातील सरकारमध्ये स्थैर्य येण्याच्या अपेक्षेने रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विकासदराचा अंदाज बदलून ७.२ टक्क्यांवर आणल्यानं देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तेजी आली," अशी प्रतिक्रिया जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी दिली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक