Join us  

सेन्सेक्समध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी, तरी गुंतवणूकदारांचे ₹३१००० कोटी बुडाले; 'या' शेअर्समुळे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 4:16 PM

भारतीय शेअर बाजारात आज किंचित तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले.

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज किंचित तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले. दरम्यान, छोट्या शेअर्समध्ये मात्र जोरदार विक्री दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं आज सुमारे 31 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.78 टक्क्यांनी घसरुन बंद झाला. तर मिडकॅप निर्देशांक 0.16 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. 

आजच्या व्यवहारात एफएमसीजी, कमोडिटी, आयटी, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण झाली. तर ऑइल अँड गॅस, पॉवर अँड युटिलिटी शेअर्सचे निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. यापूर्वी व्यवहारादरम्यान निफ्टीनं 22,440.90 या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला होता. 

कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 66.14 अंकांनी किंवा 0.09 टक्क्यांनी वाढून 73,872.29 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 21.85 अंकांच्या किंवा 0.098 टक्क्यांच्या वाढीसह 22,400.25 वर बंद झाला. 

31 हजार कोटी बुडाले 

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल आज 4 मार्च रोजी 393.69 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शनिवार, 2 मार्च रोजी 394 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 31,000 कोटी रुपयांनी कमी झालं आहे. दुसऱ्या शब्दांत, सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 31,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. 

या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी 

बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही एनटीपीसीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.72 टक्के वाढ झाली. यानंतर पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), बजाज फिनसर्व्ह आणि ॲक्सिस बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले. 

या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण 

तर उर्वरित 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स 2.22 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. तर महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि इन्फोसिसचे शेअर्स 1.28% ते 1.75% च्या घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार