Join us  

MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 9:33 AM

MobiKwik IPO: कंपनीनं ४ जानेवारी २०२४ रोजी आयपीओसाठी सेबीकडे पुन्हा अर्ज केला होता. मोबिक्विकच्या आयपीओचा हा दुसरा प्रयत्न होता. याशिवाय आणखी एका कंपनीला सेबीनं आयपीओसाठी मंजुरी दिली आहे.

MobiKwik IPO: गुरुग्रामची कंपनी मोबिक्विकला आयपीओच्या माध्यमातून ७०० कोटी रुपये उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) या कंपनीच्या आयपीओ उभारणीला मान्यता दिली आहे. मोबिक्विक एक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे जो ग्राहक आणि व्यापाऱ्यांना जोडतो. कंपनीनं ४ जानेवारी २०२४ रोजी आयपीओसाठी सेबीकडे पुन्हा अर्ज केला होता. मोबिक्विकच्या आयपीओचा हा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी कंपनीनं २०२१ मध्ये आपला पहिला ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. तेव्हा कंपनीला १९०० कोटी रुपये उभे करायचे होते.

मोबिक्विक हे पेटीएम, फोनपे आणि फ्रीचार्जसारखेच पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. परंतु, त्यांचं प्रमाण कमी आहे. कंपनीचे सुमारे १४.६ कोटी युजर्स आहेत. दरम्यान, कंपनीला पेमेंट्स, इन्स्टंट क्रेडिट आणि पर्सनल लोनमध्ये एक लहान, परंतु एक केंद्रित फिनटेक व्यवसाय उभा करायचा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोबिक्विकला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पेमेंट गेटवे उपकंपनी जॅकपेसाठी पेमेंट अॅग्रीगेटर लायसन्ससाठी तत्त्वत: मान्यता मिळाली होती.

सेबीनं पाठवलेलं फायनल ऑब्झर्व्हेशन

मोबिक्विकचा आयपीओ ७०० कोटी रुपयांचा असेल. सेबीनं कंपनीला आयपीओसाठी हिरवा कंदील दिला आहे. मोबिक्विकनं यावर्षी जानेवारीमध्ये आपला ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. नवीन शेअर्स जारी करून कंपनीला ७०० कोटी रुपये उभे करायचे आहेत. नियामकानं १९ सप्टेंबर रोजी कंपनीला आपले 'फायनल ऑब्झर्व्हेशन' पाठवलं होतं.

वारी एनर्जीच्या आयपीओलाही मंजुरी

मोबिक्विक सिस्टीमव्यतिरिक्त सेबीनं सौर पॅनेल निर्माती वारी एनर्जीजच्या आयपीओलाही मंजुरी दिली आहे. वारी एनर्जीजच्या ड्राफ्ट डॉक्युमेंट (डीआरएचपी) नुसार, प्रस्तावित आयपीओमध्ये ३,००० कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं जारी केले जातील. याव्यतिरिक्त प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक देखील ३२ लाख इक्विटी समभागांची ऑफर फॉर सेल (ओएफएस) जारी करतील.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसेबीशेअर बाजार