shakti pumps: देशातील लोकप्रिय कंपनी शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेडला हरियाणाच्या रिन्युएबल एनर्जी विभागाकडून (HAREDA) पंप पुरवण्यासाठी 73 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. शक्ती पंप्सने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला कुसुम-3 योजनेअंतर्गत हरियाणा अक्षय ऊर्जा विभागाकडून मिळालेली ही चौथी वर्क ऑर्डर आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई शेअर बाजारात शक्ती पंप्सचे शेअर्स 1162.45 रुपयांवर होते.
कंपनी 2130 पंप पुरवणार
शक्ती पंप्सने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा रिन्युएबल एनर्जी विभागाकडून प्राप्त झालेल्या ऑर्डरमध्ये सौर वॉटर पंपिंग सिस्टमसाठी 2130 पंपांचा पुरवठा, इंस्टॉलेशन आणि कमीशनिंगचा समावेश आहे. हा करार जारी झाल्यापासून 120 दिवसांच्या आत पूर्ण करायचा आहे. कंपनीने या ऑर्डरचे मूल्य 73.32 कोटी रुपये असून त्यात जीएसटीचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शक्ती पंप्सने या वर्षी जानेवारीमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंट (QIP) द्वारे 200 कोटी रुपये उभे केले आहेत
एका वर्षात शेअर्समध्ये 180% वाढ
शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात शक्ती पंप्सचे शेअर्स जवळपास 180% वाढले आहेत. 13 मार्च 2023 रोजी शक्ती पंपचे शेअर्स 415.75 रुपयांच्या पातळीवर होते. 13 मार्च 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 1162.45 रुपयांवर बंद झाले. गेल्या 6 महिन्यांत शक्ती पंप्सच्या शेअर्समध्ये 47% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 787.15 रुपयांवरून 1162.45 रुपयांपर्यंत वाढले आहेत. शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1599.50 रुपये आहे.