Share Crash:अनिल अंबानींची दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जाणारी टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉमचे शेअर्स गुरुवारी 3.70 टक्क्यांनी वाढून बंद झाले. कंपनीचे शेअर्स 1.40 रुपयांवर पोहोचले आहेत. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनं अनिल अंबानींच्या कर्जबाजारी रिलायन्स इन्फ्राटेलचे (RITL) मोबाईल टॉवर आणि फायबर मालमत्ता ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. अलीकडे, अंबानी यांनी यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एस्क्रो खात्यात ₹3720 कोटी जमा केले आहेत.
कसं बुडालं अनिल अंबांनींचं साम्राज्य; एक भाऊ आशियातील श्रीमंत, तर दुसरा…
2007 मध्ये आरकॉमचे शेअर्स 786 रुपयांवर पोहोचले होते. सध्या त्याची किंमत 1.40 रुपये आहे. त्यानुसार, आरकॉमचा स्टॉक आतापर्यंत जवळपास 100 टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी YTD मध्ये हा स्टॉक 26.32 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एका वर्षाच्या कालावधीत स्टॉक सुमारे 54.10 टक्क्यांनी घसरला. गेल्या सहा महिन्यांत यात 28.21 टक्क्यापर्यंत घसरण झाली. तथापि, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉकमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली.
अनिल धीरूभाई अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. 2016 मध्ये मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ लाँच झाल्यानंतर फ्री डेटा आणि प्राइस वॉरमुळे या कंपनीच्या अडचणी वाढल्या. तेव्हापासून कंपनीवर प्रचंड कर्ज आहे.
(टीप - शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)