Join us  

Share Market 2 july : शेअर बाजारात आधी तेजी, मग घसरण; अदानी पोर्ट्स, पॉवर वधारला; टाटा मोटर्समध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:05 AM

शेअर बाजारानं आजही इतिहास रचला आहे. बीएसईचा ३० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स पहिल्यांदाच ७९८०० च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर उघडला. मात्र नंतर त्यात घसरण झाली.

शेअर बाजारानं आजही इतिहास रचला आहे. बीएसईचा ३० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स पहिल्यांदाच ७९८०० च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर उघडला. निफ्टीनंही मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात २४२०० च्या उच्चांकी पातळीच्या वर केली. सुरुवातीच्या तेजीनंतर मात्र शेअर बाजारात थोडी घसरण झाली. १० च्या सुमारास सेन्सेक्स ९२ अंकांच्या घसरणीसह ७९३८३ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी २२ अंकांच्या घसरणीसह २४१२०.१५ अंकांवर व्यवहार करत होता.

दरम्यान सेबीनं हिंडेनबर्गला पाठवलेल्या नोटिसीनंतर अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी एंटरप्रायझेस रेड झोनमध्ये ट्रेड करत होता, तर अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत. अदानी एनर्जी सोल्युशनमध्ये सुमारे दीड टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी विल्मर आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्येदेखील वाढ दिसून आली. तर, एसीसी आणि अंबुजा सिमेंटमध्ये घसरण दिसून येत आहे.

तर दुसरीकडे ओएनजीसी, कोल इंडिया, पॉवर ग्रीड, विप्रो, ग्रासिम, इन्फोसिस, टीसीएल, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर टाटा मोटर्स, कोटक बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी लाईफच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

आशियाई बाजारात मंगळवारी घसरण नोंदविण्यात आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.४१ टक्क्यांनी घसरला, तर टॉपिक्स फ्लॅट बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.२२ टक्के तर कॉस्डॅक ०.३९ टक्क्यांनी घसरला. हाँगकाँग हँगसेंग इंडेक्स फ्युचर्सनं घसरणीचं संकेत दिले.

टॅग्स :शेअर बाजार