Share Market : कालच्या घसरणीनंतर शेअर बाजारासाठी मंगळवार 'शुभ' ठरला. सेन्सेक्स-निफ्टीने दिवसाच्या निच्चांकी पातळीपासून सुमारे १% वाढ नोंदवली. तर निफ्टीमध्ये सुमारे ३०० अंकांची वाढ दिसून आली. DeepSeek AI च्या बातमीने जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली. विशेषकरुन अमेरिकन बाजारात काल मोठी घसरण झाली. दिग्गज टेक कंपन्यांचे शेअर्सने सपाटून मार खाल्ला. यात भारतीय कंपन्याही वाचल्या नाहीत. पण, तरीही आज बँकिंग क्षेत्रात चांगली वाढ झाल्याने बाजार हिरव्या रंगात बंद झाला. याला आरबीआयचा निर्णय कारणीभूत ठरला.
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी बँकिंग आणि दर संबंधित समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. वास्तविक, आरबीआयने बँकिंग प्रणालीमध्ये तरलता इंजेक्ट करण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, सत्राच्या अखेरीस वरच्या स्तरावरून नफा बुकिंग दिसून आले.
बाजारातील तेजीचे सर्वात मोठे कारण?
आज बँकिंग शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बँकिंग प्रणालीतील तरलता वाढवण्यासाठी आरबीआयने केलेल्या घोषणेनंतर या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आहे. निफ्टी बँक २% पर्यंत वाढीसह कार्यरत दिसले. एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक या खासगी बँकांनी सर्वाधिक वाढ केली आहे. याशिवाय LIC हाउसिंग फायनान्स, बजाज फायनान्स आणि M&M फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ४% पर्यंत वाढ दिसून आली.
चीनच्या एआयचा जगाला धसका
जगात अमेरिकेन कंपनीच्या चॅट जीपीटी आणि ओपन एआयची चर्चा आहे. अशात चीनच्या फ्री आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या घोषणेनंतर जगभरातील बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम सुरुवातीच्या काळात भारतीय बाजारपेठेतही दिसून आला. जवळपास ८०० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्स ७ महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला होता. मात्र, विश्लेषकांच्या अहवालानंतर निवडक समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
बाजारात पुलबॅक
तज्ञांचे म्हणणे आहे की नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर देशांतर्गत बाजार ओव्हरसोल्ड झोनवर पोहोचला होता. यूएस डॉलर निर्देशांक आणि रोखे उत्पन्न वरच्या स्तरावरून घसरले आहे, जे बाजारासाठी सकारात्मक आहे. अशा स्थितीत, बाजारात एक पुलबॅक अपेक्षित आहे.