Join us

Rakesh Jhunjhunwala : झुनझुनवाला यांना आवडायचा डोसा, पुनर्जन्म झाल्यास देवाकडे मागितली होती ‘ही’ गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 1:27 PM

मला डोसा खूप आवडतो, असं झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं. बाहेरची पावभाजीची चव चांगली लागत नसल्यानं ती मी घरीच बनवतो, असा किस्साही त्यांनी सांगितला होता.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. त्यांना भारतातील वॉरेन बफे म्हणूनही ओळखलं जायचं. नुकतीच त्यांनी आपली एअरलाईन कंपनी आकासाची सुरूवात केली होती. आकासाच्या पहिल्या प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलेले काही किस्से आपण पाहूया.

आईच मोठी शुभचिंतक - 2009 मध्ये ET Now ला दिलेल्या मुलाखतीत राकेश झुनझुनवाला यांनी आपली आई सर्वात मोठी शुभचिंतक असल्याचे म्हटले होते. घरातील कोणीही कोणालाही शेअर बाजारातगुंतवणूक करण्यास मनाई केली नाही, परंतु इशारा दिला होता, असे त्यांनी सांगितले होते.

पुढील जन्मासाठी डिमांड - मुलाखतीत झुनझुनवाला यांनी पुढील जन्मासाठी देवाकडे काही मागणी केली होती. मला पुढील जन्मातही तेच आई-वडील, तेच भाऊ-बहीण, तीच पत्नी, तेच मित्र हवे आहेत, असे झुनझुनवाला म्हणाले होते.

अंधश्रद्धा नाही परंतु… -शेअर बाजारातील गुंतवणुकीचा नशिबाशी काही संबंध आहे का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मी अंधश्रद्धाळू आहे असे मी म्हणणार नाही. पण काही गोष्टी अशा असतात ज्यांचा आपण प्रयत्नही करत नाही, असे त्या प्रश्नाचं उत्तर देताना झुनझुनवाला म्हणाले होते.

वाढीची कल्पना होती - जेव्हा सेन्सेक्स 150 अंकांवर होता तेव्हा मला फारशी कल्पना नव्हती. परंतु 2002-2003 मध्ये, मला वाटले की भारतात अशी समृद्धी दिसून येईल ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. यामुळे बाजार विक्रमी पातळीवर जाईल, असे त्यांनी सांगितले होते.

खाण्याची आवड - मुलाखतीत झुनझुनवाला यांनी त्यांच्या छंद आणि दैनंदिन दिनचर्येबद्दलही सांगितले होते. मला वाचनाची आवड आहे. मला फूड शो पाहण्यात आनंद मिळतो. रस्त्यावरील खाद्यपदार्थ, चायनीज पदार्थ खूप आवडतात. मलाही डोसा खूप आवडतो, असे झुनझुनवाला यांनी सांगितले होते. बाहेरच्या पावभाजीची चव चांगली लागत नाही म्हणून मी घरीच बनवतो. मला आराम करायला आवडतो, मी जास्त शारीरिक हालचाली करत नाही, असेही झुनझुनवाला म्हणाले होते.

मी दाता नाही - बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना दानशूर म्हणणे पसंत नव्हते. मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मी स्वत:ला दाता म्हणणार नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपत्तीचा दाता देव आहे, आपण ती कमावली आहे असे समजू नका.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजारगुंतवणूक