Join us

Share Market : १६ महिन्यातली सर्वात मोठी एका दिवसातील घसरण, गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 4:20 PM

शेअर बाजार १६२८ अंकांनी आपटला.

शेअर बाजार बुधवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 निर्देशांक 460.30 अंकांनी घसरून 21571.95 च्या पातळीवर आला तर बीएसई सेन्सेक्स 1628 अंकांनी आपटून 71500 च्या पातळीवर बंद झाला आहे. बुधवारच्या व्यवहारात, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली आणि तो 1540 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बँकिंग शेअर्सचा समावेश होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. तर एचसीएल टेक, एसबीआय लाइफ, एलटीआय माइंडट्री, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

16 महिन्यांतली सर्वाधिक घसरण

बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ही एका दिवसाच्या कामकाजातील गेल्या 16 महिन्यांतील सर्वात घसरण आहे. यानंतर शेअर बाजाराचा सेन्सेक्स 72000 च्या खाली बंद झाला आहे. बुधवारी, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक या सर्व निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी आयटी निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाला. बुधवारच्या व्यवहारात एचसीएल टेक, एसबीआय लाइफ, टीसीएस आणि एलटीआय माइंडट्रीचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले, तर एचडीएफसी बँकेचा शेअर 8.28 टक्क्यांच्या घसरणीसह 1540 रुपयांवर बंद झाला.

अदानींच्या सर्व शेअर्समध्ये घसरण

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं तर गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. अदानी एनर्जी सोल्युशन्स 3.58 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला तर, अदानी विल्मर 1.37 टक्क्यांच्या घसरणीनं बंद झाला.

४ लाख कोटी बुडाले

आज शेअर बाजारात एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली. आजचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींसाठी सुमारे दीड वर्षातील सर्वात वाईट दिवस ठरला. यापूर्वी, देशांतर्गत बाजारात जून 2022 मध्ये अशी घसरण दिसून आली होती. बाजारातील एवढ्या मोठ्या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे.

टॅग्स :शेअर बाजार