Join us

Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 9:30 AM

Share Market : शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या सर्व टप्प्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले होते. यामध्ये पुन्हा एनडीएचं सरकार सत्तेत येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजाराला एक्झिट पोलचा बूस्टर मिळाल्याचं दिसून आलं.

Share Market : शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या सर्व टप्प्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले होते. यामध्ये पुन्हा एनडीएचं सरकार सत्तेत येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजाराला एक्झिट पोलचा बूस्टर मिळाल्याचं दिसून आलं. शेअर बाजारात आज जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. त्याची सुरुवात आज बंपर उसळीने झाली. सेन्सेक्स २६२१ अंकांच्या वादळी वाढीसह ७६५८३ च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्समधील सर्वच शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते. एल अँड टी ७ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. टेक महिंद्राचे समभाग सर्वात कमी १.४० टक्क्यांनी वधारले. निफ्टी ८०७ अंकांच्या वाढीसह २३३३७ वर उघडला. दोन्ही निर्देशांक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर उघडले. 

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी आयटी निर्देशांक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह ट्रेड करत होते. तर निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये वाढ होत होती. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात बंपर तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, एसबीआय आणि लार्सन या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. तर दुसरीकडे गॉडफ्रे फिलिप्स, डॉम्स इंडस्ट्रीज, ग्लेनमार्क लाइफ, डॉ. लाल पॅथ लॅब, सुवेन फार्मा, सफारी इंडस्ट्रीज आणि सनोफी इंडियाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

मल्टीबॅगर स्टॉकची स्थिती 

शेअर बाजाराच्या कामकाजाच्या सुरूवातीला पीएसयू शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत होती. इरकॉन इंटरनॅशनल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन, प्राज इंडस्ट्रीज, अशोक लेलँड, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, इंजिनीअर्स इंडिया, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर्स बंपर तेजीसह व्यवहार करत होते. 

प्री-ओपन मार्केटची स्थिती 

सोमवारी सुरू असलेल्या शेअर बाजाराची सुरुवात बंपर वाढीसह होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते. प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स २४१२ अंकांच्या वाढीसह ७६,३७३ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टीनं ८१९ अंकांच्या वाढीसह २३५०० अंकांची पातळी गाठली होती. शनिवारी एक्झिट पोलच्या निकालानंतर मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे शेअर बाजारात बंपर तेजी नोंदवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आता विक्री थांबवून शेअर बाजारात खरेदी सुरू करू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक