महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून येत होती. परंतु आठवड्याच्या अखेरच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा उसळी घेतली आणि बाजार ६० हजार अंकांच्या वर पोहोचला.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ७२१.१३ अंकांची वाढ होऊन शेअर बाजार ६०,५६६.४२ वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये २०३.५० अंकांची वाढ होऊन तो १८,०१०.३० अंकांवर पोहोचला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात विक्री दिसून आली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला.
"गेल्या आठवड्यात बाजार खाली आला होता. शुक्रवारी तर तो अगदीच कोसळला. मार्केट सपोर्ट जवळ असल्याचं आपण 'शेअर नॉलेज' या व्हिडीओ सीरिजमध्ये शुक्रवारी बोललो होतो. मार्केट खाली जाणार नाही अशातला भाग नाही, परंतु इथून वर जायची शक्यता जास्त वाटते. बँकांकडे लक्ष ठेवा असं सांगितलं होतं, त्यानुसार आज काही निवडक बँकांच्या शेअरमध्ये १० ते १५ टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळाली", अशी प्रतिक्रिया शेअर बाजाराचे तज्ज्ञ आणि अभ्यासक सीए निखिलेश सोमण यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. थोडं ओव्हरसोल्ड झोनमध्ये मार्केट आलं होतं. त्यामुळे हा बाऊन्सबॅक आल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोणत्या क्षेत्रात तेजी?
सोमवारी कामकाजादरम्यान प्रमुख सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. सकाळच्या सत्रात निफ्टीवर बँक, ऑटो आणि फायनॅन्शिअल इंडेक्समध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. मेटल आणि रियल्टी इंडेक्समध्ये १.५ टक्क्यांची तेजी होती. तर आयटी आणि एफएमजीसीच्या शेअर्समध्ये अर्ध्या टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. परंतु फार्मा इंडेक्समध्ये मात्र विक्रीचा जोर दिसून आला. टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, एम अँड एम च्या शेअर्समध्ये सोमवारी सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. तर सन फार्माचा शेअर सर्वाधिक घसरला.