BSE Share Return : तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. १ ऑक्टोबरपासून शेअर मार्केटमध्ये व्यवहार शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेनंतर बीएसईच्या शेअर्स रॉकेट झाले आहेत. आज सकाळी ११ वाजता BSE लिमिटेडच्या शेअर्समध्ये २.४९ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. आज एनएसईवर कंपनीच्या शेअरमध्येही वाढ दिसून येत आहे. आज एनएसईवरही कंपनीच्या शेअरमध्येही वाढ दिसून येत आहे. बीएसईने १ ऑक्टोबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील सेन्सेक्स ऑप्शन आणि बँकेक्स ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचे व्यवहार शुल्क वाढवण्याचे सांगितले आहे. सध्या बहुतांश विश्लेषक हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
२७ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एक्सचेंजने सेन्सेक्स ऑप्शन्स आणि बँकेक्स ऑप्शन्सच्या एक्सपायरीसाठी ३,२५० रुपये प्रति कोटी टर्नओव्हर मूल्यावर शुल्क निश्चित केले आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागातील इतर कोणत्याही कराराच्या व्यवहार शुल्कामध्ये कोणताही बदल झालेला नाही. इंडेक्स फ्युचर्स आणि स्टॉक फ्युचर्ससाठी सध्याच्या शुल्कात कोणताही बदल नाही, जे शून्य आहेत. सेन्सेक्स ५० ऑप्शन आणि स्टॉक ऑप्शनच्या प्रति कोटी प्रीमियम टर्नओव्हर मूल्यावर फक्त ५०० रुपये शुल्क लागू होईल.
एनएसईने वाढवलं शुल्क
BSE प्रमाणे NSE ने देखील व्यवहार शुल्कात वाढ जाहीर केली आहे. रोख बाजारासाठी, प्रति लाख व्यापार मूल्य २.९७ रुपये, इक्विटी फ्युचर्ससाठी रुपये १.७३ प्रति लाख आणि इक्विटी पर्यायांसाठी रुपये ३५.०३ प्रति लाख आकारले जातील. करेन्सी मार्केटसाठी प्रति लाख ट्रेडेड व्हॅल्यूवर ०.३५ रुपये आणि करेन्सी ऑप्शन आणि इंट्रेस्ट रेट ऑप्शनवर प्रति लाख ट्रेड व्हॅल्यू ३१.१० रुपये आकारले जाईल.
सेबीकडूनही बदल
यापूर्वी, बाजार नियामक सेबीने १ जुलै २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व सदस्यांवर समान शुल्क आकारले जावे असे म्हटले होते. आत्तापर्यंत, ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या स्लॅबनिहाय रचनेच्या आधारावर व्यवहार शुल्क आकारले जात होते. तसेच, सेबीने सांगितले होते की स्टॉक ब्रोकर्सने गोळा केलेले कोणतेही शुल्क MII कडून मिळालेल्या शुल्काशी समान पाहिजे.
एका वर्षात किती परतावा
बीएसईच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज इंट्राडेमध्येच स्टॉक २ टक्क्यांहून अधिक वाढला होता, तर गेल्या एका महिन्यात त्याने ३१.७२ टक्के परतावा दिला आहे. जर आपण ६ महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या स्टॉकने ४१.८३ टक्के परतावा दिला आहे, तर २०२४ मध्ये आतापर्यंत ६४.९० टक्के परतावा दिला आहे. गेल्या १२ महिन्यांच्या परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, बीएसई लिमिटेडच्या स्टॉकने १८२.८६ टक्के इतका जबरदस्त परतावा दिला असून गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ तिप्पट केले.