Share Market : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे. रोज नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत. यूएस फेडच्या व्याजदर कपातीचा सकारात्मक परिणाम बाजारात पाहायला मिळत आहे. शेजारी राष्ट्र चीनचा असाच एक निर्णय भारतीय कंपन्यांच्या पथ्यावर पडताना पाहायला मिळत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीचा सामना करण्यासाठी आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चीनच्या सेंट्रल बँकेने अनेक प्रमुख पावले उचलण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम चीनमध्ये हळूहळू दिसून येईल पण भारतातील काही क्षेत्रांमध्ये त्याचा मोठा प्रभाव लगेच दिसून येत आहे.
वास्तविक, चीन सरकारच्या व्याजदरात कपात आणि आर्थिक पॅकेजच्या घोषणेमुळे मेटल आणि केमिकल क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. निफ्टी मेटल इंडेक्स आज अडीच टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. NALCO, NMDC, MOIL, SAIL, वेदांता, टाटा स्टील आणि हिंदाल्कोसह सर्व धातूंचे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी वाढले आहेत. चीनकडून आलेल्या बातम्यांमुळे केमिकल क्षेत्रातील शेअर्समध्येही चांगली खरेदी होताना दिसत आहे. चीनमधील व्याजदर कपातीच्या घोषणेनंतर मेटल आणि केमिकल सेक्टरचे शेअर्स का वधारले ते जाणून घेऊ.
चीनच्या निर्णयाने मेटल क्षेत्रात तेजी का?भारताच्या धातू क्षेत्राचा चीनशी थेट संबंध आहे. चीन हा जगभरात स्टीलचा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारतातून चीनमध्ये लोह आणि पोलाद मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते. भारत मुख्यतः कच्चा माल किंवा दुय्यम वस्तू चीनला निर्यात करतो. यातून चीन आपली उत्पादने तयार करुन विकतो. यामुळेच चीनच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक निर्णयाचा थेट परिणाम भारताच्या पोलाद क्षेत्रावर होतो. याशिवाय रासायनिक क्षेत्रावरही चीनच्या निर्णयांचा परिणाम होतो.
मेटल आणि केमिकल शेअर्स भाव खाणार?चीनमधील व्याजदर कपातीचा परिणाम थेट परिणाम भारताच्या धातू आणि खाण क्षेत्रावर दिसून येत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत लोहखनिज खाण कंपन्यांचे शेअर्स वधारण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ऑक्टोबरच्या पतधोरणात आरबीआय व्याजदर कमी करू शकते, अशी आशा तज्ज्ञांना आहे.
(Disclaimer यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)