सोमवारी शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीनं झाली. मात्र, कामकाजाच्या अखेरच्या तासात त्यात रिकव्हरी दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास फ्लॅट बंद झाले. ब्रॉड मार्केटवरही दबाव राहिला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.44 टक्के आणि 0.50 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं सुमारे एक लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचं झाल्यास, आयटी आणि एफएमसीजी वगळता इतर सर्व शेअर्समध्ये विक्री दिसून आली.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसईवरील (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 79.27 अंकांनी किंवा 0.12 टक्क्यांनी वाढून 65,401.92 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 6.25 अंकांनी किंवा 0.032 टक्क्यांनी वाढून 19,434.55 वर बंद झाला.
1 लाख कोटी बुडाले
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सोमवारी 303.68 लाख कोटी रुपयांवर घसरले. मागील ट्रेडिंग दिवसाच्या म्हणजेच शुक्रवार 11 ऑगस्ट रोजी ते 304.68 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1 लाख कोटी रुपयांची घट झाली.
या शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही इन्फोसिसच्या शेअरमध्ये सर्वाधिक 1.58 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), आयसीआयसीआय बँक (ICICI बँक), लार्सन अँड टुब्रो (L&T) यांच्या शेअर्सनं आज थोडा स्पीड पकडला आणि ते 0.64 टक्के ते 1.55 टक्क्यांपर्यंतच्या वाढीसह बंद झाले.
यामध्ये घसरण
दुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 17 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सर्वाधिक 2.47 टक्क्यांनी घसरले. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), टाटा स्टील (Tata Steel), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) आणि अल्ट्राटेक सिमेंटचे (UltraTech Cement) शेअर्स सर्वात जास्त घसरले. यामध्ये जवळपास 1.20 ते 2.37 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातीलल जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)