Sensex - Nifty : गुंतवणूकदारांसाठी हा संपूर्ण आठवडा धडधड वाढवणारा ठरला. हा ट्रेंड सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीही पाहायला मिळाला. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात तीव्र चढउतार दिसून आले. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज सर्वाधिक विक्री झाली. क्षेत्रीय आघाडीवर, रियल्टी, तेल आणि वायू आणि फार्मा समभाग घसरले. तर एनर्जी, ऑटो आणि पीएसई निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. एफएमसीजी, आयटी निर्देशांक वाढीसह बंद झाले. यामध्ये तुमच्याकडे कोणते स्टॉक्स होते? त्यात काय झालं? चला जाणून घेऊ.
बाजारात आज काय घडलं?
शुक्रवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १९ शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली. निफ्टीमधील ५० पैकी ३२ समभाग लाल रंगात बंद झाले. तर निफ्टी बँकेचे १२ पैकी १० शेअर्स गडगडले. डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी मजबूत झाला असून रुपया ८६.२१ वर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स ३३० अंकांनी घसरला आणि ७६,१९० वर बंद झाला. निफ्टी ११३ अंकांनी घसरला आणि २३,०९२ वर बंद झाला. निफ्टी बँक २२१ अंकांनी घसरून ४८,३६८ च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक ८३६ अंकांनी घसरून ५३,२६३ च्या पातळीवर बंद झाला.
कोणत्या शेअर्स सर्वाधिक घसरले?
आज निफ्टीच्या घसरणीत HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि M&M यांचा वाटा मोठा राहिला. तर एचयूएल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टाटा कंझ्युमरमध्ये खरेदी दिसून आली. या समभागांचा आज निफ्टीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या सटॉक्सच्या यादीत समावेश करण्यात आला. त्रैमासिक निकालानंतर, डॉ रेड्डीज लॅब्स आज घसरले. हा निफ्टीचा आजचा सर्वात कमकुवत स्टॉक होता. तिमाही निकालानंतर श्रीराम फायनान्सला फटकला बसला. तर ट्रेंट ४ टक्क्याने घसरला.
MPhasis इंट्रा-डे मध्ये एक तीव्र रिकव्हरी दिसून आली. व्यवस्थापनाच्या सकारात्मक कॉमेंट्रीनंतर आज हा समभाग ३% वाढीसह बंद झाला. लॉरस लॅब आज ३% वाढीसह बंद झाले. तिसऱ्या तिमाहीत मजबूत निकालानंतर अंबर एंटरप्रायझेस ३% वाढीसह बंद झाला. मार्गदर्शनात कपात केल्यानंतर सिंजीन ६% घसरुन बंद झाला. Cyient आज २४% खाली बंद झाला. IEX हिरव्या रंगात बंद झाला. पण या समभागावर वरच्या पातळीचा दबावही दिसून आला.
नकारात्मक निकालानंतर ग्रॅन्युल्स, थायरोकेअर, मॅनकाइंड, स्पंदना, तेजस, जिंदाल सॉ घसरुन बंद झाले. त्याच वेळी, सोना BLW, सूर्योदय SFB वर कमकुवत दृष्टीकोनचा प्रभाव दिसल्याने ६% टक्के खाली बंद झाले.
का घसरतोय बाजार?
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून बाजार सातत्याने घसरत आहे. यापाठीमागे दोनतीन महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं म्हणजे परकीय संस्थात्कम गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सातत्याने पैसा काढून घेत आहेत. दुसरीकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आल्याने डॉलर आणखी मजबूत झाला आहे. परिणामी रुपयाचे अवमुल्यन होत आहे. तिमाही निकालांमध्ये अनेक क्षेत्रातील कंपन्याचे निकाल नकारात्मक आहेत. तर शेवटचं कारण म्हणजे भारतीय शेअर बाजार महाग असल्याने त्यात करेक्शन होत असल्याचेही बोलले जातंय.