Closing Bell: शेअर बाजाराने नव्या आर्थिक वर्षाची धमाकेदार सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्सनं 363 अंकांची उसळी घेत 74,000 चा टप्पा पार केला. निफ्टीही 22,462 पर्यंत वाढला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 6.38 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 2.98 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर मिडकॅप निर्देशांक 1.64 टक्क्यांनी वाढला. कंझ्युमर ड्युरेबल सोडून बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले.
कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 363.20 अंकांनी किंवा 0.49 टक्क्यांनी वाढून 74,014.55 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 135.10 अंकांच्या किंवा 0.61% च्या वाढीसह 22,462.00 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी 6.38 लाख कोटी कमावले
बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 1 एप्रिल रोजी वाढून 393.35 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 28 मार्च रोजी 386.97 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवर लिस्डेट कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 6.38 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6.38 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.88% वाढ झाली. यानंतर, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि लार्सन अँड टुब्रोचे (एल अँड टी) शेअर्स सर्वाधिक वाढले.
यामध्ये सर्वाधिक घसरण
सेन्सेक्सचे केवळ 10 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही टायटनचे शेअर्स 1.57 टक्क्यांसह सर्वाधिक घसरले. तर नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.