देशांतर्गत शेअर बाजारानं आज म्हणजे बुधवार 21 जून 2023 रोजी एक नवा इतिहास रचला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने आपला आजवरचा उच्चांकी स्तर गाठला. आपला जुना विक्रम मोडण्यासाठी सेन्सेक्सला 203 दिवसांचा कालावधी लागले. यापूर्वी 1 डिसेंबर 2022 सेन्सेक्सने 63583.07 ची पातळी गाठून उच्चांकाचा विक्रम केला होता. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास 63,588.31 चा स्तर गाठून सेन्सेक्सनं आजवरचा उच्चांकी स्तर गाठला आहे.
कामकाजाच्या सुरुवातीला व्यवहारात सेन्सेक्स 185 अंकांनी वाढून 63512 अंकांवर होता. त्याच वेळी, निफ्टी 38 अंकांच्या वाढीसह 18855 च्या स्तरावर होता. निफ्टीच्या 50 स्टॉक्सपैकी 32 मध्ये वाढ तर 18 मध्ये घसरण दिसून आली होती. दुसरीकडे, सेन्सेक्समधील केवळ 14 शेअर्समध्ये तेजी होती. अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, विप्रो, एल अँड टी आणि हीरो मोटोकॉर्प हे निफ्टी टॉप गेनर्स होते, तर डिव्हिस लॅब, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, सिप्ला आणि सन फार्मा या शेअर्सचा समावेश निफ्टी टॉप लूसर मध्ये होता.
आज अदानी एंटरप्रायझेस, अदानी विल्मर, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही या अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. तर अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस यांच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली.