bharat electronics : नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. मात्र, या निकालानंतर ईव्हीएम मशीन वादात सापडले आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हा वाद आता केंद्रात पोहचला असून लवकरच विरोधक रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचंही बोललं जात आहे. ईव्हीएम घोटाळा झाला की नाही हे समोर येईलच. पण, ईव्हीएमची निर्मिती करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे, यात शंका नाही.
भारतात, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या २ सरकारी कंपन्या ईव्हीएम तयार करतात. यापैकी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ही शेअर बाजारात लिस्टेडड कंपनी आहे. या शेअर्सने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
बीईएल शेअर्सचा परतावा
बीईएलचा शेअर आज ०.५० टक्क्यांच्या घसरणीसह ३०५.८० रुपयांवर बंद झाला. मात्र, ५ दिवस आणि एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सने अनुक्रमे १० आणि १३ टक्के परतावा दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिकच्या शेअर्सचा ऐतिहासिक परतावा आश्चर्यकारक आहे. कंपनीने गेल्या २५ वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. जानेवारी १९९९ मध्ये या सरकारी कंपनीच्या एका शेअरची किंमत ०.२२ पैसे होती, ती आता ३०५ रुपये झाली आहे.
या कालावधीत, शेअर्सने १३९,१९५.४५ टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या पैशात जवळपास १४०० पट वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने BEL चे १००० शेअर्स ०.२२ पैशांनी खरेदी केले असते, तर त्यांची एकूण किंमत २२० रुपये झाली असती. आता त्याची किंमत ३०५ रुपये आहे. अशा स्थितीत एक हजार शेअर्सचे एकूण मूल्य ३ लाख रुपयांपेक्षा जास्त होते. गेल्या वर्षांत, बीईएलच्या शेअर्सने सुमारे ८०० टक्के परतावा दिला आहे.
विशेष म्हणजे या कंपनीत सरकारचा सर्वाधिक हिस्सा आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने प्रवर्तकांचा त्यात ५१ टक्के हिस्सा आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा १७.७ टक्के, म्युच्युअल फंडांचा १५.८१ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा ११.३७ टक्के आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत भारतीय आणि परदेशी गुंतवणूकदारांनी कंपनीतील त्यांचे स्टेक फारसे कमी केलेले नाहीत.
(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)