दिवाळीनंतर जागतिक पातळीवरील सकारात्मक बातम्यांमुळे बुधवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी तीस शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्स 742.06 अंक अर्थात 1.14 टक्क्यांनी वधारला आणि 65,675.93 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान, हा एकवेळ 813.78 अंकांपर्यंतही पोहोचला होता. याच बरोबर, नॅशनल स्टॉक एक्सचेन्जचा निफ्टीही 231.90 अंक अर्थात 1.19 टक्क्यांनी वाढून 19,675.45 अंकांवर बंद झाला आहे.
गुंतवणूकदारांची दिवाळी -
दिवाळीनंतर, शेअर बाजारातगुंतवणूकदारांना जवळपास 3.3 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. BSE-सूचीबद्ध असलेल्या सर्व शेअर्सचे एकूण बाजार भांडवल 325.41 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. महत्वाचे म्हणजे, मंगळवारी पाडव्याच्या दिवशी शेअर बाजार बंद होता. यापूर्वी, बीएसई सेन्सेक्स सोमवारी 325.58 अंक आणि निफ्टी 82 अंक घसरला होता.
असं आहे तेजीचं कारण -
खरे तर, अमेरिकेतील चलनवाढीसंदर्भातील उत्साहवर्धक वृत्तामुळे सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह पॉलिसी दरात आणखी वाढ न करण्याची शक्यता वाढली आहे. आधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 4.87 टक्क्यांवर आला. प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने महागाई कमी झाली आहे. त्याच वेळी घाऊक महागाई दर सलग सातव्या महिन्यात घसरला आणि तो शून्याहून 0.52 टक्के राहिला आहे.
अशी आहे शेअरची स्थिती -
सेंसेक्सच्या कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, इन्फोसिस, विप्रो, टाटा स्टील, टाटा कंसल्टेन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अॅक्सिस बँकला फायदा झाला. तर तोट्यात असलेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि पॉवर ग्रिड यांचा समावेश आहे.