Join us  

Stock Market Drop Today : शेअर बाजारात घसरणीची हॅटट्रिक; Sensex १६६ अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे ₹१.५७ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 4:12 PM

Stock Market Drop Today : भारतीय शेअर बाजार मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बीएसईमध्ये लिस्टिंग कंपन्यांचे मार्केट कॅप दिवसभरात १.५७ लाख कोटी रुपयांनी घसरलं.

Stock Market Today : भारतीय शेअर बाजार मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बीएसईमध्ये लिस्टिंग कंपन्यांचे मार्केट कॅप दिवसभरात १.५७ लाख कोटी रुपयांनी घसरलं. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही कंपन्यांचे व्यवहार तेजीसह सुरू झाले होते. मात्र, नंतर त्याला आपली तेजी कायम राखता आली नाही. 

कामकाजाच्या अखेरिस सेन्सेक्स जवळपास १६६ अंकांनी घसरून बंद झाला. अमेरिकी अर्थव्यवस्थेत मंदीच्या भीतीनं बाजाराची धारणा कमकुवत आहे. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक ०.७१ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.५७ टक्क्यांनी घसरून बंद झाला. आयटी, एफएमसीजी आणि रियल्टी वगळता इतर सर्व सेक्टोरल निर्देशांकही घसरले.

कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स १६६.३३ अंकांनी घसरून ७८,५९३.०७ वर बंद झाला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी ६३.०५ अंकांच्या घसरणीसह २३,९९२.५५ च्या पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे १.५७ लाख कोटींचे नुकसान

बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप सोमवारी ४४१.८४ लाख कोटी रुपयांवरून ६ ऑगस्ट रोजी ४४०.२७ लाख कोटी रुपयांवर आलं. अशाप्रकारे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

केवळ ११ शेअर ग्रीन झोनमध्ये

ही घसरण इतकी तीव्र होती की, सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ११ समभाग आज तेजीसह बंद झाले. यामध्ये जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.३२ टक्क्यांची वाढ झाली. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी), एचसीएल टेक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर (एचयूएल) यांचे शेअर्स १.२६ ते १.६३ टक्क्यांपर्यंत वधारले.

सेन्सेक्सचे ५ सर्वाधिक घसरलेले शेअर्स

तर सेन्सेक्सचे उर्वरित १९ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक १.७७ टक्क्यांनी घसरले. याशिवाय भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर्स ०.८३% ते १.४४% घसरणीसह लाल रंगात बंद झालं.

टॅग्स :शेअर बाजार