Share Market: काही काळाच्या पडझडीनंतर या सरत्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजीचा माहौल पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने ६० हजारांचा टप्पा ओलांडत गुंतवणूकदारांना मोठाच दिलासा दिला. मात्र, यातच आता शेअर मार्केटमधील या तेजीचा गुजरातमधील तब्बल १६ कंपन्यांना सर्वाधिक लाभ झाल्याचे सांगितले जात आहे. या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्येही लाखो कोट्यवधी रुपयांची वाढ झाली असून, यात बहुतांश कंपन्या दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपच्या असल्याचे म्हटले जात आहे.
यंदाच्या १७ जून २०२२ रोजी निर्देशांक ५१,३६०.४२ च्या नीचांकी पातळीवर होता. दोन महिन्यांत निर्देशांकाने १७.३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. निर्देशांकांनी उसळी घेतल्याने १७ जून ते १७ ऑगस्ट या दोन महिन्यांत गुजरातमधील १६ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल ६.५७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. औषध कंपन्यांमधील दिग्गज सन फार्मास्युटिकल्स आणि झायडस लाइफसायन्सेस यांच्या बाजार भागभांडवलात अनुक्रमे ३०,४३० कोटी आणि ६,०९०.७ कोटी रुपयांची वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम गुजरात फ्लोरोकेमिकल्स लि.ने ही ११,४७७ कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे. या कंपनीच्या शेअर्सने दोन महिन्यांत मोठी उसळी घेतली.
अदानी समूहाच्या कंपन्यांना सर्वाधिक फायदा
शेअर बाजारातील या तेजीचा सर्वाधिक फायदा अदानी समूहाच्या कंपन्यांना झाला आहे. अदानी ट्रान्समिशन (१.७५ लाख कोटी रुपये), अदानी टोटल गॅस अदानी टोटल गॅस (१.४५ लाख कोटी), अदानी एंटरप्रायझेस (१.१२ लाख कोटी), अदानी ग्रीन एनर्जी (८४,९१३ कोटी), अदानी पॉवर (४५,७४३ कोटी) आणि अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (३२,७६२ कोटी) या कंपन्यांच्या बाजार भागभांडवलात सर्वाधिक वाढ झाली.
दरम्यान, सर्वोत्तम परतावा देणाऱ्या शेअर्स मध्ये अदानी समूहाच्या तीन शेअर्सचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात अदानी पॉवरने ३०६ टक्के, अदानी टोटल गॅसने २७६ टक्के आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सने २६६ टक्के परतावा दिल्याचे सांगितले जात आहे.