प्रसाद गो. जोशी
बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आल्याने गतसप्ताहामध्ये शेअर बाजारात मोठी पडझड झाली असून, दीर्घकालीन विचार करता खरेदीसाठी ही उत्तम संधी आली आहे. कमी झालेल्या किमतीमध्ये अनेक चांगले समभाग उपलब्ध झाले असून, त्यामुळे आपला पोर्टफोलिओ सुधारण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळाली आहे. आगामी सप्ताहामध्ये जाहीर होणाऱ्या विविध आकडेवारीने बाजाराची दिशा ठरणार असून, त्यात बाजार वर जाण्याचा संकेत मिळत आहे.
गतसप्ताहामध्ये बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले. परिणामी बाजाराचे जवळपास सर्वच निर्देशांक लाल रंगामध्ये बंद झाले आहेत. याआधीचे तीन सप्ताह वाढत असलेल्या बाजारातील सर्वच वाढ या सप्ताहामधील घसरणीने वाहून गेली. सेन्सेक्स १५३८.६४ अंशांनी घसरून ५९,४६३.९३ अंशांवर बंद झाला. निफ्टीवरही दबाव वाढत असून, तो १७,५०० अंशांच्या खाली आला आहे. त्यात ४७८.४० अंशांची घसरण झाली. मिडकॅप आणि स्माॅलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घट झाली आहे. हे निर्देशांक अनुक्रमे २४,१७८.७३ व २७,५८४.५९ अंशांवर बंद झाले आहेत.
विदेशी वित्तसंस्थांचा विक्रीचा धडाका
- शेअर बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांकडून विक्रीचा धडाका चालूच आहे. गतसप्ताहात या संस्थांनी ३,१०० कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत.
- परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीमुळे खाली येत असलेला बाजार सावरण्याचा देशांतर्गत वित्तसंस्थांचा प्रयत्न मात्र अपुरा पडला. देशांतर्गत संस्थांनी ३,२०० कोटी रुपयांची खरेदी केली तरी बाजाराचे निर्देशांक खालीच आले.
- फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत वित्तसंस्थांनी १२,४०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.
आकडेवारीकडे लक्ष
आगामी सप्ताहामध्ये वाहन विक्री तसेच जीडीपीबाबतची आकडेवारी जाहीर होणार आहे. ती समाधानकारक राहिल्यास वाढ अपेक्षित आहे. तसेच अमेरिकेत बॉण्डवरील व्याज दरांवरही परकीय वित्तसंस्थांचा निर्णय अवलंबून आहे. त्याकडेही बाजाराचे लक्ष असणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन खरेदीसाठी ही सुवर्णसंधी मानली जावी.