आर्थिक वर्ष २०२४ आता संपणार आहे. हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी अतिशय उत्तम ठरलं. या आर्थिक वर्षात भारतीय गुंतवणूकदारांच्या निव्वळ संपत्तीत १३२ लाख कोटी रुपयांची किंवा सुमारे १.६ ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान, बीएसईचं मार्केट कॅप २६२ लाख कोटी रुपयांवरून ३९४ लाख कोटी रुपये किंवा ४.७ ट्रिलियन डॉलर्स पर्यंत वाढलं. गुरुवारी, आर्थिक वर्षाच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी, सेन्सेक्स सुमारे एक टक्के किंवा ६५५ अंकांनी वाढून ७३,६५१ वर बंद झाला. गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजारात आज शुक्रवारी आणि त्यानंतर शनिवार, रविवारनिमित्त शेअर बाजारात कामकाज होणार नाही.
बीएसईच्या डेटावरून या आर्थिक वर्षात ओल्ड इकॉनॉमी असलेल्या कंपन्यांनी भविष्यातील चांगली शक्यता दर्शविली. यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचे शेअर्स घेतले. पण गुंतवणूकदारांना सॉफ्टवेअर कंपन्या, एफएमसीजी आणि खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये कमी रस राहिला. सेन्सेक्स शेअर्समध्ये टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत दुप्पट झाली तर सरकारी कंपनी एनटीपीसीचा शेअरही या काळात जवळपास दुपटीनं वाढला. दुसरीकडे एचयूएल, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सनं सर्वाधिक निराशा केली. या आर्थिक वर्षात सेन्सेक्स २५% वाढला तर, निफ्टीमध्ये २९ टक्क्यांची वाढ झाली. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, रिअल इस्टेटमध्ये १२९%, युटिलिटीज ९३% आणि पॉवर ८६% नं वाढले. दुसरीकडे, बँकेक्स ६%, एफएमजीसी १७% आणि वित्तीय सेवा २२% वाढली.
चीनच्या घसणीचा फायदा
अमेरिकेमध्ये व्याजदर उच्च राहिल्यानं भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत विदेशी फंड्सच्या विक्रीची भीती वाढली. पण चिनी बाजाराची खराब कामगिरी भारतीय बाजारासाठी वरदान ठरली. यामुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समध्ये २.१ लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. एफपीआय गुंतवणुकीच्या दृष्टीने हे दुसरं सर्वोत्तम वर्ष आहे. २०२१ मध्ये देशात २.७ लाख कोटी रुपयांची एफपीआय गुंतवणूक आली.
एकीकडे भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीचं वातावरण दिसत असून दुसरीकडे मात्र चीनची अर्थव्यवस्था घसरत आहे. "सकारात्मक GDP दृष्टीकोन, उत्पादन क्षेत्रावर भर आणि संरचनात्मक सुधारणांमुळे भारत हे फॉरेन इनफ्लोसाठी आवडतं ठिकाण बनलं आहे," अशी प्रतिक्रिया युनियन एमएफचे संजय बेबळकर यांनी दिली.