गतसप्ताहामध्ये बाजाराने आधीची घोडदौड कायम राखली नाही. मात्र आगामी सप्ताहात बाजार नरम-गरम राहू शकतो. अर्थसंकल्प जवळ येत असून, त्यामुळे साहजिकच काहीशी सावधानता गुंतवणूकदार बाळगून आहेत. याशिवाय जून महिन्याची सौदापूर्ती होत असल्याने बाजारावर काही प्रमाणात विक्रीचे दडपण राहण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीतील निर्णयांवर बाजाराची प्रतिक्रिया बघायवास मिळेल. अमेरिकेतील बँकांच्या स्ट्रेस सेटच्या निकालाकडे बाजाराचे लक्ष आहे.
परकीय वित्तसंस्थाकडून पुन्हा खरेदी सुरू
परकीय वित्तसंस्था आता भारतीय शेअर बाजारात पुन्हा खरेदीसाठी उतरल्या आहेत. त्यांच्याबरोबरच देशांतर्गत वित्तसंस्थाही मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याचे दिसून आले आहे. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून ९१०३ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.
त्यांनी या महिन्याचा विचार करता आतापर्यंत १२,१७० कोटी रुपयांचे समभाग विकत घेतले आहेत. रोख्यांमध्ये या संस्था पूर्वीपासूनच खरेदी करीत होत्या. गतसप्ताहात यामध्ये १०,५७५ कोटी रुपये गुंतविले गेले आहेत.