Join us  

Share Market Investment: मेगा रिटर्न! ३७ पैशांचा शेअर २९५ ₹वर, १२ हजाराचे झाले १ कोटी; गुंतवणूकदारांची दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 1:38 PM

Share Market Investment: या कंपनीने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

Share Market Investment: कोरोनासह अन्य जागतिक घडामोडींचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर होताना पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. शेअर बाजारातील आयटी कंपन्यांच्या शेअर्सची कामगिरी मंदावताना दिसत आहे. मात्र, अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. सीके बिर्ला समूहाची कंपनी असलेल्या BirlaSoft ने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. केवळ १२ हजार गुंतवणुकीची किंमत १ कोटीच्या घरात पोहोचली आहे. 

बिर्लासॉफ्टचे शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजारात २९५ रुपयांवर व्यवहार करत आहे. या वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत ४७ टक्क्यांहून घसरली असली तरी कंपनीच्या शेअर्समध्ये रिकव्हरी दिसून येत आहे. मात्र, बिर्लासॉफ्टच्या शेअरची किंमत गेल्या २१ वर्षांत प्रचंड वाढली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत ८१० पटीने वाढली आहे.

१२ हजाराचे झाले १ कोटी रुपये

२ सप्टेंबर २००१ रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त ३७ पैसे होती. तर आता हेच शेअर्स २९५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. म्हणजेच २१ वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीत केवळ १२ हजार रुपये गुंतवले असते तर आता त्याचे मूल्य १ कोटी रुपयांपर्यंत वाढले असते, असे सांगितले जात आहे. बिर्लासॉफ्ट शेअर्सवर या वर्षी दबाव दिसून आला. १० जानेवारी २०२२ रोजी या कंपनीचे शेअर ५८५.८५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. यानंतर त्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ५६ टक्क्यांनी घसरून २६२.३० रुपये झाली. 

दरम्यान, या कंपनीच्या शेअरने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आणि या शेअरमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. ऑक्टोबरनंतर आतापर्यंत हा शेअर सुमारे १४ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. 

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक