Share Market Investment: गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यातच सन २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजारात सकारात्मकता दिसून आली. परंतु, कोरोनाचे पुन्हा आलेले संकट, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे आक्रमक धोरण याचा परिणाम शेअर बाजारात दिसू शकेल, असे सांगितले जात आहे. मात्र, काही कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. एका कंपनीने अवघ्या १५ दिवसांत गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दिला असून, या कंपनीच्या शेअर अप्पर सर्किट लागताना दिसत आहे.
या कंपनीचे नाव Sbec शुगर असून, साखर उद्योगाशी संबंधित ही कंपनी आहे. Sbec शुगरच्या शेअरने गेल्या १८ ट्रेडिंग सत्रांमध्ये जवळपास २६९ टक्के परतावा दिला आहे. BSE वर १ डिसेंबर २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २४.३५ रुपयांच्या पातळीवर होते. तर आताच्या घडीला हा शेअर ९०.०५ रुपयांवर व्यवहार करत आहे. एखाद्या व्यक्तीने १ डिसेंबर रोजी एसबीईसी शुगरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या त्याची किंमत ३.६९ लाख रुपये झाली असती.
आतापर्यंत गुंतवणूकदारांना २८६ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
SBEC शुगरच्या शेअरनी यंदाच्या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांना २८६ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. सन २०२२ च्या प्रारंभी कंपनीचे शेअर्स २३.३० रुपयांवर व्यवहार करत होते. SBEC शुगरचा शेअर आताच्या घडीला ९०.०५ रुपयांवर आहे. गेल्या वर्षभरात साखर कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे २९८ टक्के परतावा दिला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे ४२९ कोटी रुपये आहे.
दरम्यान, शेअर बाजाराने शेअर्सच्या वाढीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले होते. यावर उत्तर म्हणून, एसबीईसी शुगरने सांगितले होते की, सध्या त्यांच्याकडे किंमतीच्या हालचालीवर परिणाम करणारी कोणतीही माहिती नाही.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"