Share Market Investment: आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांवर होत आहे. मात्र, काही कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये टाटा समूहातील कंपन्या आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. टाटाच्या एका कंपनीबाबत शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला असून, या कंपनीत दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक आहे.
टाटा समूहाची कंपनी ही कंपनी म्हणजे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड आहे. या कंपनीचे बाजारमूल्य ३७ हजार ८५ कोटी रुपयांहून अधिक आहे. येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने हा शेअर १३१० ते १३३२ रुपयांच्या श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर ब्रोकरेज हाऊसने या समभागाची लक्ष्य किंमत १५३५ रुपये आणि स्टॉप लॉस रुपये १२१२ रुपये दिला आहे.
रेखा झुनझुनवाला यांची किती आहे गुंतवणूक?
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे की, गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. भविष्यातही ही गती कायम राहील, अशी आशा आहे. येत्या काही महिन्यांत कंपनीचे शेअर मूल्य १५३५ रुपयांपर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच सप्टेंबर २०२२ पर्यंत या कंपनीचे ४५ लाख ७५ हजार ६८७ शेअर्स होते. ही माहिती टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार आहे. अशा प्रकारे रेखा झुनझुनवाला यांची कंपनीत एकूण १.६१ टक्के हिस्सेदारी होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यात टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या एका शेअरची किंमत १,२९७.८० रुपये होते. तर सोमवारच्या सकाळच्या सत्रात या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ नोंदवण्यात आली. या शेअरची किंमत १,३१५ च्या आसपास होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"