Share Market Investment: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, यातच TATA ग्रुपचा बोलबाला केवळ भारतीय किंवा जगभरातील बाजारात नाही, तर देशाच्या शेअर मार्केटमध्येही असल्याचे सांगितले जात आहे. टाटा ग्रुपची एक कंपनी दमदार कामगिरी करत असून, या कंपनीबाबत बाजारतज्ज्ञांना मोठ्या अपेक्षा आहेत. या कंपनीचा शेअर ५६५ रुपयांवर जाऊ शकतो, असा कयास बांधला जात असून, हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला शेअर मार्केटच्या तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
टाटा ग्रुपमधील या कंपनीचे नाव टाटा मोटर्स आहे. तिमाही निकालानंतर ब्रोकरेज टाटा मोटर्सचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. देशांतर्गत कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ३,०४३ कोटींचा नफा कमावल्याचे सांगितले जात आहे. या तिमाहीत वाहनांची चांगली विक्री झाल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, गेल्या डिसेंबर तिमाहीत टाटा समूहाची ब्रिटिश युनिट जॅग्वार लँड रोव्हर (जेएलआर) च्या महसुलात २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टाटाच्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली
सेमीकंडक्टर चिप्सचा वाढलेला पुरवठा तसेच टाटाच्या वाहनांना वाढती मागणी यामुळे कंपनीने तिमाहींमध्ये प्रथमच नफा नोंदवला आहे. कंपनीचे लक्झरी कार युनिट असलेल्या जॅग्वार लँड रोव्हरला चांगली कमाई करता आली, असे सांगितले जात आहे. चिपचा तुटवडा हळूहळू कमी होईल आणि येत्या काही दिवसांत JLR फायद्यात येऊ शकेल, असे ब्रोकरेज जेफरीजचे म्हणणे आहे. नवीन आरआर-स्पोर्ट आणि डिफेंडरच्या मागणीत ७४ टक्क्यांची मोठी वाढ आहे. त्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर ५६५ रुपयांवर जाऊ शकतो. तसेच हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीला १,४५१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, या तिमाहीत तिचे एकूण उत्पन्नही ८८,४८९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ७२,२२९ कोटी होते. स्टँडअलोन आधारावर, या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा दुपटीने वाढला आहे. टाटा मोटर्सचा शेअर आताच्या घडीला ४१८.६० रुपयांवर व्यवहार करत आहे.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"