Share Market Investment: आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र, यातच काही कंपन्या चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत आहेत. मल्टिबॅगरच्या यादीत असणारी केमिकल क्षेत्रातील एक कंपनी गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवत आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या कंपनीने मालामाल केले आहे.
केमिकल क्षेत्रातील दिग्गज विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स इतक्या वेगाने वाढले की, २० वर्षांत ६१०० रुपयांची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने विनती ऑरगॅनिक्सची लक्ष्य किंमत १९९० रुपये निश्चित केली आहे. आताच्या घडीला या कंपनीचा शेअर १९४९ रुपयांवर व्यवहार करत आहे.
तिमाहीत १० टक्क्यांची भरघोस वाढ नोंदवली
विनती ऑरगॅनिक्सने ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजच्या अंदाजांना मागे टाकत डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत समायोजित केलेल्या निव्वळ नफ्यात १०० टक्के वाढ नोंदवली. अपेक्षेपेक्षा कमी कच्च्या मालाचा खर्च आणि कमी ऑपरेटिंग खर्चामुळे त्याचा निव्वळ नफा वाढला. दुसरीकडे, ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, कंपनीचे सध्याचे मूल्यांकन जास्त आहे. यामुळे, ब्रोकरेजने सवलतीच्या रोख प्रवाहाच्या आधारे १९९० रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे आणि विक्रीचे रेटिंग दिले आहे.
दरम्यान, विनती ऑरगॅनिक्सचे शेअर १४ फेब्रुवारी २००३ रोजी अवघ्या १.१७ रुपयांना उपलब्ध होते. आता या कंपनीचा शेअर १९४९ वर व्यवहार करत आहे. म्हणजे त्या वेळी फक्त ६१०० रुपयांची गुंतवणूक आता एक कोटी रुपयांवर गेली असती. अल्पावधीत परताव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर, विनती ऑरगॅनिक्सने अवघ्या ७ महिन्यांत ४२ टक्के परतावा दिला आहे.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"