Join us

३२ रुपयांवर आलेला आयपीओ, ५ महिन्यांत गेला १६५ पार; ४२१% ची तुफान तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 3:46 PM

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. पाच महिन्यांत, या शेअर्सनं लोकांना श्रीमंत केलंय. कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपयांच्या किमतीत आला.

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. पाच महिन्यांत, इरेडाच्या (IREDA) शेअर्सनं लोकांना श्रीमंत केलंय. इरेडाचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपयांच्या किमतीत आला. 10 एप्रिल 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 166.40 रुपयांवर बंद झाले. इरेडाचे शेअर्स 32 रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत 421% वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 215 रुपये आहे. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (IREDA) शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 49.99 रुपये आहे. 

कंपनीच्या शेअर्समध्ये 421% तेजी 

इरेडाचा IPO 21 नोव्हेंबर 2023 रोजी उघडण्यात आला आणि तो 23 नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. सरकारी कंपनी इरेडाचे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारावर 49.99 रुपयांना लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचे शेअर्स मोठ्या वाढीसह 59.99 रुपयांवर बंद झाले. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये 87 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. इरेडाच्या शेअर्समध्ये लिस्ट झाल्यापासून प्रचंड वाढ होत आहे. कंपनीचे शेअर्स 10 एप्रिल 2024 रोजी 166.40 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या पब्लिक इश्यूचा एकूण आकार 2150 कोटी रुपयांपर्यंत होता. 

38 पटींपेक्षा अधिक झाला सबस्क्राईब 

इरेडाचा IPO एकूण 38.80 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत कंपनीच्या आयपीओमध्ये 7.73 पट सबस्क्रिप्शन मिळालं. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा (NII) 24.16 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा 104.57 पट सबस्क्राइब झाला. इरेडाच्या आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांचा कोटा 9.80 पट सबस्क्राइब झाला. इरेडाच्या आयपीओमध्ये, किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बेट लावू शकतात. आयपीओच्या एका लॉटमध्ये 460 शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना इरेडाच्या आयपीओमध्ये किमान 14720 रुपये गुंतवावे लागले. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहेत. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक