कामकाजाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. कामकाजादरम्यान शेअर बाजारानं बंपर उसळी घेतली. दुपारी दोनच्या सुमारास निफ्टीनं २२८७८ नवा उच्चांकी स्तर गाठला. तर सेन्सेक्सनंही आपला ९ एप्रिल रोजीचा ७५१२४ अकांचा विक्रम मोडत नवा ७५१३३ चा नवा उच्चांकी स्तर गाठला.
निफ्टी टॉप गेनरमध्ये अदानी एंटरप्रायझेस ४.१४ टक्क्यांनी वधारून ३२७०.९० रुपयांवर ट्रेड करत होता. तर अॅक्सिस बँक ३.३० टक्क्यांनी वधारून ११६३ वर, एल अँड टी २.८९ टक्क्यांनी वधारून ३५६१ वर आणि इंडसइंड बँक २.०३ टक्क्यांनी वधारून १४३३.४५ रुपयांवर ट्रेड करत होता. तसंच कामकाजादरम्यान आयशर मोटर्समध्येही १.८५ टक्क्यांची वाढ झाली.
सेन्सेक्समधील बदलाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. तसंच बीएसई १०० निर्देशांकातही बदल होऊ शकतात. आयआयएफएल रिसर्चनुसार, या बदलात अदानी एंटरप्रायझेसचा सेन्सेक्समध्ये प्रवेश शक्य आहे. या एन्ट्रीमुळे अदानीमध्ये जवळपास १००० कोटी रुपयांची खरेदी करणं शक्य आहे. आयआयएफएलरिसर्चनुसार, विप्रो सेन्सेक्समधून बाहेर पडू शकते. यामुळे विप्रोमध्ये ४६६ कोटी रुपयांची विक्री दिसून येण्याची शक्यता आहे.