Share Market : तुम्ही शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, पुढच्या आठवड्यात चीन मोठी खेळी खेळणार आहे. चीनच्या निर्णयाचे थेट परिणाम भारतीय बाजार आणि गुंतवणूकदारांवर होऊ शकतो. गेल्या महिन्यात चीनने काही आर्थिक पावलं उचलल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी त्सुनामी आली होती. अशा परिस्थितीत चीन पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आहे.
ब्लूमबर्गने २३ आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या सर्वेक्षणानंतर दावा केला आहे की चीन सरकार पुढील आठवड्यात २८३ अब्ज डॉलरचे (सुमारे 24 लाख कोटी रुपये) मदत पॅकेज जारी करणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये चीनने १२ लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जारी केले होते. या पॅकेजनंतर चीनमध्ये पैशांचा पाऊस पडला होता. शांघाय स्टॉक एक्सचेंजचे मार्केट कॅप सुमारे २६९ लाख कोटी रुपयांनी वाढले होते. याउलट, भारतीय शेअर बाजार सलग 5 सत्रांमध्ये जोरात घसरला. यामध्ये गुंतवणूकदारांचे १६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यावेळी दुप्पट मदत पॅकेज जाहीर केल्यास त्याचाही दुप्पट परिणाम होऊ शकतो, असा अंदाज गुंतवणूकदार आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत.
भारतावर काय परिणाम होणार?
गेल्या आठवड्यातील आकडेवारीवरुन चीनच्या पॅकेजचा भारतीयांवर काय परिणाम होईल याचा अंदाज आला असेल. चिनी सरकाराच्या निर्णयानंतर तेथील अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. सरकारने व्याजदर कमी केल्याने ५ कोटी लोकांना थेट फायदा झाला होता. भारताच्या तुलनेत चीनच्या बाजारपेठेची व्याप्ती वाढल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी येथून पैसे काढून तिथे टाकण्यास सुरुवात केली. परिणामी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एफपीआयने पुन्हा माघार घेण्यास सुरुवात केल्यास पुढील आठवड्यातही बाजाराला घसरण होण्याची भीती आहे.
चीन का घेतोय असे निर्णय?
कोरोना महामारीनंतर जगभरातील अर्थव्यवस्था कमकूवत झाल्या आहेत. चीनला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. यामुळे केवळ अर्थव्यवस्थाच मंदावली नाही, तर सरकार आणि जनतेच्या खर्चातही लक्षणीय घट झाली. त्याचा परिणाम चीनच्या व्यवसायावरही दिसून आला. जगातील सर्वात मोठ्या कारखान्यातील औद्योगिक उपक्रमही थंडावले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे.