शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात सलग पाच सत्रांत वाढ दाखविली होती. आज दिवाळी असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. असे असले तरी तासाभरासाठी शेअर बाजार उघडणार असून लक्ष्मीपूजनावेळी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. सायंकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत गुंतवणूकदार ही ट्रेडिंग करू शकणार आहेत.
दोन्ही एक्स्चेंजला आज सुट्टी असली तरी दिवाळीनिमित्त संध्याकाळी एक तास मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे, ज्यामध्ये अनेकजण आपली गुंतवणूक सुरू करतील आणि काही जण मोठी रक्कम लावून आपले नशीब आजमावतील. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 106 अंकांनी वाढून 59,307 वर बंद झाला होता, तर निफ्टी 12 अंकांनी वाढून 17,576 वर पोहोचला होता. आजच्या व्यवहारातही तेजीचे वातावरण असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आज जागतिक बाजाराची चालही सकारात्मक दिसत आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत गुंतवणूकदारांवरही होईल व त्यांना याचा लाभ मिळेल. ब्लॉक डील सत्र संध्याकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत असेल, तर प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी 6 ते 6.08 पर्यंत असेल. या विशिष्ट व्यवहारात सेन्सेक्स ६० हजारांचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आले होते. एका तासाच्या या सत्रात बीएसई सेन्सेक्स ६० हजारांच्या वर पोहोचला होता.
पन्नास वर्षांची परंपरा...शेअर बाजारात दिवाळीच्या सणाला मुहूर्त साधण्याची परंपरा सुमारे 50 वर्षे जुनी आहे. दिवाळीचा सण हिंदू नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेची सुरुवात करतो. संपूर्ण भारतात, हा सण संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य यांचे स्वागत करण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो.