Share Market Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये आताच्या घडीला घसरण सुरू असल्याचे दिसत आहे. काही सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. शेअर मार्केटमधील फार्मा सेक्टरमधील एका कंपनीच्या शेअरने रॉकेट स्पीड पकडत चांगलाच धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. सुरुवातीला अवघ्या २५ पैशांचा असलेला हा शेअर आता ७३६ रुपयांच्या आसपास व्यवहार करत असून, यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
उच्च परताव्याच्या बाबतीत मल्टिबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांचे नशीब बदलणारे ठरतात. अस्थिर आणि जोखमीचा व्यवसाय मानल्या जाणाऱ्या शेअर बाजारात कधी, कोणती गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना श्रीमंत करू शकते, याबाबत निश्चित सांगता येत नाही. असाच चमत्कार कॅपलिन पॉइंट लॅबच्या शेअर्सने केला आहे. केवळ ३५०० रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. कॅपलिन पॉइंट लॅबचे शेअर्स २१ फेब्रुवारी २००३ रोजी केवळ २५ पैशाच्या नाममात्र किमतीत उपलब्ध होते. परंतु आता त्याची किंमत ७३६ रुपयांवर पोहोचली आहे.
गुंतवणूकदारांना सुमारे २,९०० पट परतावा दिला
सुमारे २० वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे २,९०० पट परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत ज्या गुंतवणूकदाराने दोन दशकांपूर्वी या शेअरवर अवलंबून राहून केवळ ३,५०० रुपयांची गुंतवणूक केली असती, आता ती गुंतवणूक १ कोटी रुपयांपर्यंत वाढली असेल. कॅपलिन पॉइंट लॅब ही एक फार्मा कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय आफ्रिकन देशांमध्ये पसरलेला आहे. या फार्मास्युटिकल कंपनीचा व्यवसाय १९९० मध्ये सुरू झाला. त्याचे मुख्यालय चेन्नई येथे असून कंपनीची १९९४ मध्ये बाजारात सूचिबद्ध झाली होती. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला.
सन २०२२ मध्ये शेअरने पकडला रॉकेट स्पीड
वर्ष २०२२ च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. ६ जानेवारी २०२२ रोजी या कंपनीचा शेअर ८८८.४५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. पण अलीकडच्या काळात त्याच्या स्टॉकचे मूल्य घसरले. मे २०२२ मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ६०० रुपयांच्या पातळीवर घसरली होती. पण नंतर स्टॉक सावरण्यास सुरुवात झाली आणि आता त्याने पुन्हा ७०० रुपयाची पातळी पार करत ७३६ रुपयांवर आला आहे.
दरम्यान, गेल्या पाच वर्षातील चढ-उतार पाहिल्यास २२ डिसेंबर २०१७ रोजी कॅपलिन पॉइंट लॅब कंपनीचे शेअर्स ६३८.२५ रुपयांच्या पातळीवर होते. तर २८ डिसेंबर २०१८ रोजी ३८२ रुपयांपर्यंत खाली घसरला. त्यांनतर २० डिसेंबर २०१९ रोजी ३१३.२० रुपयांवर आणि २० मार्च २०२२ रोजी त्याची किंमत फक्त २३८ रुपयांवर घसरले. यानंतर, कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेण्यास सुरुवात केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"