Join us

२ ₹चा शेअर गेला १,८६२ ₹वर, १ लाखाचे झाले १२ कोटी! तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 3:25 PM

Share Market Multibagger Stock: केमिकल क्षेत्रातील कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

Share Market Multibagger Stock: शेअर मार्केटमधील काही कंपन्या दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. यातच काही कंपन्याचा मल्टिबॅगर यादीत समावेश असून, या कंपनीने गुंतवणूकदारांना कोट्यधीश केले आहे. सुरुवातीला अगदी २ रुपयांवर असलेल्या या कंपनीचा स्टॉक आताच्या घडीला १,८६२ रुपयांवर व्यवहार करत आहे. एखाद्या व्यक्तींना १ लाख रुपयांची गुंतवणूक करून ती कायम ठेवली असती, तर सध्या त्याची किंमत १२ कोटी रुपये झाली असती, असे सांगितले जात आहे. 

या कंपनीचे नाव दीपक नायट्रेट असून, ही केमिकल क्षेत्रातील कंपनी आहे. या समभागाने २ रुपयांवरून  १८०० रुपयांचा आकडा पार केला आहे. दीर्घ मुदतीत कंपनीच्या शेअरने जोरदार गुंतवणुकीसोबत बोनसही दिला आहे. ११ एप्रिल २००३ रोजी दीपक नाइट्राइटचे शेअर्स बीएसईवर २.८५ रुपये प्रति शेअरने ट्रेडिंग करत होते. आताच्या घडीला या कंपनीचे शेअर्स १,८६२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअर्समध्ये एप्रिल २००३ मध्ये जर एखाद्याने १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याला ३५०८७ शेअर्स मिळाले असते. अलीकडील काळात दीपक नायट्रेट कंपनीने १:१ च्या प्रमाणात बोनसचे वितरण केले. बोनस मिळाल्यानंतर शेअर्सची संख्या ७०१७५ पर्यंत वाढली असती. अशा स्थितीत या शेअर्सचे एकूण मूल्य सध्या १२.९० कोटी रुपये झाले असते.

गेल्या ७ वर्षांत कंपनीने २५०० टक्के परतावा दिला

कंपनीने गेल्या काही वर्षात दमदार रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत. गेल्या ७ वर्षांत २५०० टक्क्यांचा परतावा कंपनीने दिला आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी बीएसईवर दीपक नायट्रेटचे शेअर्स ६९.८० रुपयाच्या पातळीवर व्यवहार करत होते. या ७ वर्षांत स्टॉकने २५३४ टक्के परतावा दिला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने २९ एप्रिल २०१६ रोजी दीपक नाइट्राइटच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि ती कायम ठेवली असेल, तर आज १ लाख रुपये २६.३४ लाख झाले असते. 

दरम्यान, शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची मानली जाते. शेअर मार्केटमध्ये भरपूर अस्थिरता आहे. गेल्या काही काळापासून अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सचे भाव निम्म्यावर आले असूनही काही छोट्या शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. शेअर मार्केट आकड्यांचा खेळ आहे. जर तुम्ही अचूक निष्कर्ष लावला तर पेनी स्टॉक तुम्हाला कोट्यधील करू शकतो, पण एक चुकीचा निर्णय सर्व भांडवल बुडवू शकतो, असे सांगितले जाते.

(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक