share market new rule : कोरोना काळापासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातही म्युच्युअल फंडात दिवसेंदिवस गुंतवणूक वाढतच चालली आहे. जर तुम्ही शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तर बाजार नियामक सेबीने तुम्हाला मोठा दिलासा दिला आहे. सेबीने डिमॅट आणि म्युच्युअल फंड खात्यांतील नॉमिनी आणि इतर सुरक्षा बाबींशी संबंधित नवीन नियम अधिसूचित केले आहेत. नवीन नियमानुसार गुंतवणूकदार काही कारणाने अक्षम झाल्यास, त्याच्या वतीने नामॉनी आर्थिक निर्णय घेऊ शकतो. या सुविधेचा फायदा असा होईल की नॉमिनीला डिमॅट आणि म्युच्युअल फंड खाते चालवण्याचे पूर्ण अधिकार मिळतील. नवीन नियम २८ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.
सामान्य गुंतवणूकदारांना हा दिलासा देण्यासाठी सेबीने 'डिपॉझिटरी अँड पार्टिसिपंट्स एक्सचेंज'मध्ये सुधारणा केल्या आहेत. या बदलाद्वारे, गुंतवणूकदार किंवा भागधारक निर्णय घेऊ शकत नसल्यास, नामनिर्देशित व्यक्ती त्याच्या जागी निर्णय घेऊ शकतात, अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, यासाठी काही सुरक्षा अटीही ठेवण्यात आल्या आहेत.
गुंतवणूकदारांना मिळतील विशेष पर्याय
- प्रत्येक गुंतवणूकदाराने एखाद्या व्यक्तीला लाभार्थी म्हणून नामांकित करणे अनिवार्य असेल. जेणेकरून त्याचे शेअर्स आणि सिक्युरिटीज मृत्यूनंतर हस्तांतरित करता येतील.
- गुंतवणूकदाराने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला किंवा अक्षम झाल्यास त्याच्या वतीने व्यवहार करण्यासाठी अधिकृत केले जाऊ शकते.
- एकापेक्षा जास्त नॉमिनी असल्यास, गुंतवणूकदार कोणत्याही एका व्यक्तीला त्याच्या वतीने व्यवहार करण्यासाठी अधिकृत करू शकतो.
- गुंतवणूकदारांना डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडामध्ये 10 व्यक्तींना नामनिर्देशित करण्याची परवानगी असेल. यापूर्वी ही संख्या ३ पर्यंत मर्यादित होती.
- गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तितक्या वेळा नॉमिनी बदलू शकतील. त्याचवेळी, एकाच मोबाईल क्रमांकावरून कुटुंबातील सदस्यांची ट्रेडिंग खाती ऑपरेट करण्याची सुविधा असेल.
- नॉमिनी गुंतवणूकदाराच्या कायदेशीर वारसांसाठी विश्वस्त म्हणून काम करतील. यासाठी नामनिर्देशित व्यक्तींना पॅन, पासपोर्ट क्रमांक किंवा आधार यासारखी कागदपत्रे द्यावी लागतील.