Join us  

LIC चा मोठा निर्णय! १०५ कंपन्यांतील हिस्सा कमी केला; किती कोटींची झाली कमाई? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 5:42 PM

LICने टॉप १० कंपन्यातील आपली कोट्यवधी शेअर्सची हिस्सेदारी घटवली आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

LIC Share Market:शेअर बाजारात अनेक दिग्गज कंपन्यांनी आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. काहींना यात अपार यश मिळाले, तर काही कंपन्यांची जादू बिलकूल चालली नाही. भारतातील सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या LIC चा शेअर आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. गत तिमाहितील चांगल्या निकालांमुळे एलआयसीचा शेअर उसळी घेताना दिसत आहे. 

अशातच शेअर मार्केटमधील एक मोठी गुंतवणूकदार असलेल्या एलआयसीने जवळपास १०५ कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी घटवल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये देशभरातील टॉपच्या कंपन्या असून, यातून एलआयसीने कोट्यवधी रुपये उभारल्याचे सांगितले जात आहे. 

१०५ कंपन्यांमधील हिस्सा कमी केला

एलआयसी ही देशांतर्गत शेअर बाजारातील सर्वांत मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. यामुळे कंपनीचा प्रत्येक गुंतवणूकदार एलआयसीवर लक्ष ठेवून असतो. एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत १०५ कंपन्यांमधील हिस्सा कमी केला. एलआयसीने टॉप १० शेअर्समध्ये २० हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.   

मारुती सुझुकीतील हिस्सा ४.८६ टक्क्यांवरून ३.४३ टक्क्यांवर आणला

या यादीत पहिले नाव देशातील सर्वांत मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत मारुतीमधील ४.३२ दशलक्ष शेअर्स विक्री करुन एलआयसीने आपला हिस्सा ४.८६ टक्क्यांवरून ३.४३ टक्क्यांवर आणला. प्राइम डेटाबेस ग्रुपच्या मते, कंपनीला या विक्रीतून ३,८१४ कोटी रुपये मिळाले. तसेच एलआयसीने एनटीपीसीमध्येही काही नफा बुक केला. या वर्षात आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स ३५ टक्क्यांनी वधारले आहेत. एलआयसीने त्यात आपला हिस्सा ९.९७ टक्क्यांवरून ८.६१ टक्क्यांवर आणला आहे. एलआयसीने या कंपनीतील २,०६६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. 

सरकारी कंपनीतील हिस्सेदारीही घटवली

या यादीत सरकारी कंपनी पॉवरग्रीड दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स आठ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत या कंपनीचे २४५२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याचप्रमाणे एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत सन फार्मा, एचएएल, अल्ट्राटेक सिमेंट, सिमन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बजाज ऑटोचे शेअर्स विकले.

दरम्यान, सन फार्मामध्ये २३५६ कोटी रुपये, एचयुएलमध्ये २०३३ कोटी, एलएएलमध्ये १९४० कोटी, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये १४८२ कोटी, सिमन्समध्ये १४३५ कोटी, ब्रिटानियामध्ये १२३५ कोटी आणि बजाज ऑटोमध्ये १००५ कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एलआयसीशेअर बाजार