Join us

२ महिन्यानंतर बाजारात तेजी! सेन्सेक्स ११३१ तर निफ्टी ३२६ अंकांची वाढ; ही आहेत ५ मोठी कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:54 IST

share market : गेल्या २ महिन्यांतील सर्वात मोठी इंट्राडे वाढ मंगळवारी बाजारात दिसून आली. निफ्टी-सेन्सेक्समध्ये ही वाढ ५ मुख्य कारणांमुळे झाली आहे. ऑटो आणि बँकिंग समभागांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला.

share market : गेल्या ५ महिन्यांपासून तणावात असलेल्या गुंतवणूकदारांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला असणार. मंगळवार हा शेअर बाजारासाठी 'शुभ' दिवस होता. आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स जबरदस्त वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाले. आजच्या वाढीसह निफ्टी जवळपास महिनाभरातील सर्वोच्च पातळीवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचे सर्व क्षेत्र निर्देशांक वाढीने बंद झाले. रिॲल्टी, ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये वाढ झाली. बँकिंग, पीएसई आणि फार्मा निर्देशांकात चांगली वाढ दिसून आली. ऊर्जा, आयटी आणि तेल आणि वायू चांगली खरेदी झाली. आज, गेल्या २ महिन्यांतील बाजारात सर्वात मोठी इंट्राडे वाढ दिसून आली आहे. यासह निफ्टी २२,८०० आणि सेन्सेक्स ७५,३०० पार करण्यात यशस्वी झाला.

शेअर बाजाराची स्थिती कशी होती?मंगळवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स १,१३१ अंकांच्या वाढीसह ७५,३०१ वर बंद झाला. निफ्टी ३२६ अंकांच्या वाढीसह २२,८३४ वर बंद झाला. निफ्टी बँक ९६० अंकांच्या वाढीसह ४९,३१५ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १,०५५ अंकांच्या वाढीसह ४९,५१७ वर बंद झाला.

कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ?आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचा आज निफ्टी आणि बँक निफ्टी वाढण्यात सर्वाधिक योगदान आहे. बजाज फिनसर्व्हमधील डीलनंतर नफा बुकिंग दिसून आले. भारती एअरटेलमध्ये घसरण झाली. पीबी फिनटेक ८% वाढीसह बंद झाला. बाजारातील तेजीचा परिणाम भांडवली बाजारातील कंपन्यांवरही दिसून आला. सीडीएसएल, सीएएमएस आणि एंजेल वन ५% पर्यंत वाढीसह बंद झाले.

Zomato आणि Paytm मध्ये आजही खरेदी दिसून आली असून हे समभाग ६-७% च्या वाढीसह बंद झाले. सकारात्मक ब्रोकरेज अहवालानंतर गोदरेज कंझ्युमर आणि वरुण बेव्हरेजेस ३-५% वाढीसह बंद झाले. रियल्टी समभाग ४% वाढून बंद झाले. MobiKwik आज २०% वाढीसह वरच्या सर्किटवर बंद झाला. सोमवारच्या घसरणीनंतर, ओला इलेक्ट्रिक आज १३% वाढीसह बंद झाला.

बाजारातील तेजीची कारणे

  • जागतिक शेअर बाजारातील मजबूत ट्रेंडने भारतीय गुंतवणूकदारांमध्ये उत्साह भरला आहे. काल अमेरिकन बाजार मजबूत वाढीसह बंद झाले. आशियाई बाजारातही आज तेजी दिसून आली.
  • नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर, गुंतवणूकदारांनी स्वस्त मुल्यांकनात शेअर्स खरेदी केले, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात उत्साह दिसून आला.
  • अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक संकेतांमुळे बाजाराचे मनोबल उंचावले. भारताची व्यापार तूट साडेतीन वर्षांतील नीचांकी पातळीवर गेली आहे. आर्थिक वर्ष २५ च्या ३ तिमाहीत GDP वाढ ६.२% झाली, IIP ५.१% वाढला, कर संकलन १६% वाढले.
  • अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी मजबूत होऊन ८६.७१वर आला, जो सोमवारी २४ पैशांच्या वाढीसह ८६.८१ वर बंद झाला. मजबूत इक्विटी मार्केट आणि आशियाई चलनांची स्थिरता यामुळे रुपयाला आधार मिळाला. त्यामुळे आयात स्वस्त झाली असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
  • चीनचे आर्थिक पॅकेज आणि किरकोळ विक्री आणि चलनवाढीत अपेक्षेपेक्षा चांगली वाढ झाल्याने आशिया बाजारात उत्साह निर्माण झाला. याचा परिणाम भारतावर विशेषत: धातू क्षेत्रावर झाल्याने चीनकडून मागणीत अपेक्षित वाढ होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी