Join us

सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:47 IST

Stock Market : आठवड्यातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी बँक पुन्हा एकदा नवीन विक्रमी उच्चांकावर बंद होण्यात यशस्वी झाली.

Stock Market : भारतीय शेअर बाजाराने आता वेग पकडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोमवारी अमेरिकेतील शेअर बाजार घसरुनही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मंगळवारी शेअर बाजाराने छक्का लगावला. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग सहाव्या दिवशी वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक आज नवीन उच्चांकावर बंद होण्यात यशस्वी झाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदी दिसून आली. क्षेत्रीय आघाडीवर, आज रिअल्टी आणि एफएमसीजी समभागांमध्ये खरेदी दिसून आली. पीएसयू बँक, फार्मा, मेटल निर्देशांक वाढीसह बंद झाले. दुसरीकडे आयटी, पीएसई आणि ऊर्जा समभागांवर दबाव दिसून आला.

आजच्या बाजारातील तेजीत बँकिंग समभागांचा सर्वाधिक वाटा होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेतही आज खरेदी सुरूच राहिली.

आज बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?मंगळवारी दिवसभराच्या कामकाजानंतर, सेन्सेक्स १८७ अंकांच्या वाढीसह ७९,५९६ वर बंद झाला. निफ्टी ४२ अंकांनी वाढून २४,१६७ वर बंद झाला. निफ्टी बँक ३४३ अंकांनी वाढून ५५,६४७ वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ४२३ अंकांनी वाढून ५४,३९७ वर बंद झाला.

कोणत्या शेअर्समध्ये काय झालं?ब्रोकरेज कंपन्यांनी सकारात्मक नोट्स जारी केल्यानंतर एफएमसीजी शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले. आयटीसी आणि एचयूएल हे सर्वाधिक वाढणारे होते. तर शुल्काबाबतच्या अधिसूचनेनंतर, स्टील कंपन्यांचे स्टॉक्स हिरव्या रंगात बंद झाले. पण, दिवसाच्या उच्च पातळीपेक्षा किंचित घट झाली. EY ला नवीन फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून नियुक्त केल्यानंतर इंडसइंड बँकेचे शेअर्स ५% घसरले.

जेफरीजने त्यांचे रेटिंग कमी केल्यानंतर बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर १-२% ने घसरले. सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, सोने वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. चोला इन्व्हेस्टमेंट्स आज सुमारे ६% ने बंद झाला. बीआयएस नियमांमध्ये शिथिलता आल्याच्या बातमीनंतर एसीशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. व्होल्टास २% वाढून बंद झाला.

निकाल येण्यापूर्वी एयू स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स घसरले. परंतु, हॅवेल्स आणि टाटा कंझ्युमरचे शेअर्स वाढीसह बंद झाले. चौथ्या तिमाहीच्या निकालांपूर्वी एचसीएल टेक्नॉलॉजीजचा शेअर स्थिर राहिला. एचडीएफसी बँक आता देशातील तिसरी सूचीबद्ध बँक आहे, ज्यांचे बाजार भांडवल १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

वाचा - रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर

अल्फाबेटने पिक्सेलचे उत्पादन भारतात आणल्याच्या बातमीनंतर डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये ६% वाढ झाली. रिअल्टी शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली. ते २-४% वाढीसह बंद झाले. सरकारने GIFT सिटीमध्ये दारूचे नियम शिथिल केल्यानंतर USL चा शेअर 3% आणि UBL चा शेअर 1% वाढीसह बंद झाला. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी