Stock Market : भारतीय शेअर बाजाराची घौडदौड सुरुच आहे. सोमवारी (२३ सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात जागतिक बाजारातून स्थिर संकेत येत आहेत. गेल्या आठवड्यात यूएस फेडच्या बैठकीपूर्वी बाजार सावध झाला होता. मात्र, फेडरल बँकने व्याजदरात कपातीची घोषणा करताच बाजाराने पुन्हा ऐतिहासिक उच्चांक गाठला. यूएस फेडच्या निर्णयाचा परिणाम जागतिक शेअर बाजारातही पाहायला मिळाला होता. जागतिक तसेच स्थानिक बाजारांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. शुक्रवारी अमेरिकन बाजारातही काही प्रमाणात नफा बुकिंग दिसून आले. सध्या जपानच्या बाजारपेठांमध्ये आज सुट्टी आहे. दुसरीकडे, गिफ्ट निफ्टीमध्ये १४६ अंकांची जबरदस्त वाढ दिसून आली आणि निर्देशांक २५,९०० च्या वर होता. त्याच वेळी, अमेरिकन फ्युचर्स मार्केट देखील वेगाने व्यवहार करत आहेत. अशा परिस्थितीत सेन्सेक्स-निफ्टी आज पुन्हा नवे विक्रमी उच्चांक गाठतात की नाही हे पाहावे लागेल.
भारतीय शेअर बाजार आजही तेजीत
देशांतर्गत शेअर बाजाराची उत्तम कामगिरी आजही कायम राहण्याचे संकेत दिसतायेत. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने आज सोमवारी नवीन विक्रमी उच्चांकासह व्यवहार सुरू केला. याआधी शुक्रवारीही देशांतर्गत बाजाराने नवीन शिखर गाठण्याचा विक्रम केला होता. सकाळी ९.१५ वाजता, सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह ८४,८४३.७२ अंकांवर उघडला, जो मागील विक्रमी उच्च पातळीच्या वर आहे. निफ्टीनेही 80 हून अधिक अंकांच्या वाढीसह २५,८७२.५५ अंकांच्या नव्या उच्चांकावर सुरुवात केली.
बाजारातील तेजी कायम राहण्याची अपेक्षा
देशांतर्गत बाजारात व्यवहार सुरू होण्यापूर्वीच आज तेजीचा कल कायम राहण्याची चिन्हे होती. प्री-ओपन सत्रात, सेन्सेक्स सुमारे ११० अंकांच्या वाढीसह ८४,६५० अंकांच्या वर व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे ८० अंकांच्या वाढीसह २५,८७० अंकांच्या पुढे व्यवहार करत होता. सकाळी गिफ्ट सिटीमधील निफ्टी फ्युचर्स जवळपास १०० अंकांनी वाढले होते.
शुक्रवारी बाजारात नवीन विक्रम
तत्पूर्वी, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजाराने उच्चांकी पातळी गाठली. शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स १,३५९.५१ अंकांच्या (१.६३ टक्के) वाढीसह ८४,५४४.३१ अंकांवर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी५० हा ३७५.१५ अंकांच्या (१.४८ टक्के) वाढीसह २५,७९०.९५ अंकांवर बंद झाला होता.