Share Market Open Today: सलग नवा उच्चांक नोंदवल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी कामकाजादरम्यान दबाव दिसून आला. सकाळी ९.१५ वाजता सेन्सेक्स ६० अंकांच्या वाढीसह ८५,८९३.८४ अंकांवर उघडला. निफ्टीची सुरुवात ३२ अंकांच्या वाढीसह २६,२४८.२५ अंकांवर झाली. व्यवहाराच्या पहिल्या काही मिनिटांत बाजार मर्यादित रेंजमध्ये दिसला. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सेन्सेक्स केवळ ३५ अंकांच्या वाढीसह ८५,८७० अंकांच्या जवळ तर निफ्टी १६ अंकांनी वधारून २६,२३५ अंकांच्या जवळ व्यवहार करत होता.
प्री ओपनिंगमध्ये स्थिती काय?
देशांतर्गत बाजारात व्यवहार सुरू होण्यापूर्वी आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ही तेजी कायम राहण्याची चिन्हं दिसत होती. प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स सुमारे ६० अंकांच्या वाढीसह ८५,९०० अंकांच्या जवळ, तर निफ्टी सुमारे ३० अंकांच्या वाढीसह २६,२५० अंकांच्या जवळ पोहोचला.
या आठवड्यात सलग नवे विक्रम
देशांतर्गत शेअर बाजारानं या आठवड्यात सातत्यानं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. बाजारानं आठवड्याची सुरुवात नव्या उच्चांकासह केली. गुरुवारीही हा विक्रम कायम राहिला. गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्सनं ८५,९३०.४३ अंकांचा नवा उच्चांक तर निफ्टीने २६,२५०.९० अंकांचा नवा उच्चांक गाठला. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स ६६६.२५ अंकांनी वधारून ८५,८३६.१२ अंकांवर आणि निफ्टी २११.९० अंकांनी (०.८१ टक्के) वधारून २६,२१६.०५ अंकांवर बंद झाला.
प्रमुख शेअर्सची स्थिती
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील जवळपास निम्मे शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. सुरुवातीच्या सत्रात आयटी शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. इन्फोसिस २.६० टक्क्यांसह सर्वाधिक वधारला. टेक महिंद्रामध्येही अडीच टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एचसीएल टेक आणि टीसीएसचे शेअरही २ टक्क्यांहून अधिक वधारले. दुसरीकडे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन सर्वाधिक २.२७ टक्के, एल अँड टी सुमारे २ टक्के आणि भारती एअरटेल सुमारे २ टक्क्यांनी घसरले.