सकारात्मक जागतिक संकेतांचा प्रभावामुळे गुरुवारी शेअर बाजारातील कामकाजाला तेजीसह सुरुवात झाली. निफ्टी ७२ अंकांनी वधारून २४३९६ वर, तर सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारून ८०१७० च्या पातळीवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवसायात आयटी क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. आजच्या कामकाजादरम्यान टीसीएसवर फोकस असेल.
आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, एशियन पेंट्स, टीसीएस, पॉवर ग्रिड, हिंडाल्को, टाटा स्टील, एनटीपीसी या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर अल्ट्रा टेक सिमेंट्स, आयटीसी, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बाजारात बुधवारच्या प्रॉफिट बुकिंगनंतर आज निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये महत्त्वाच्या पातळीची टेस्ट होऊ शकते. निफ्टी महत्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्या आसपास आहे. दरम्यान, प्रॉफिट बुकिंग निर्देशांकावर वर्चस्व गाजवू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, बाजारातील खरेदी-विक्रीचे स्वरूप कायम आहे.
बाजारात बुधवारी 'बिअर आऊट डे' होता आणि उच्चांकी स्तरावरून विक्रीचा दबाव होता. मात्र, काल दिवसअखेर समोर आलेल्या पातळीतून काही प्रमाणात सुधारणा झाली. आजची गॅप अप ओपनिंग असली तरी २४४०० ची पातळी निफ्टीसाठी मोठी रेझिस्टन्स लेव्हल ठरू शकते. निफ्टीची ओपनिंग २४४०० च्या जवळपास झाली आहे, त्यामुळे साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी ही स्ट्राईक प्राइस खूप महत्त्वाची ठरणार आहे.
उच्च पातळीवर नफावसुली झाल्यानं बुधवारी देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव होता. आजच्या व्यवहारात दिग्गज टीसीएस पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार असल्यानं आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर फोकस असणार आहे.