सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज मोठी सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात जवळपास २ टक्के बाजार तुटला होता. आज सेन्सेक्स २२९ अंकांनी वधारून ७३,४२७.६५ वर, तर निफ्टी ७० अंकांनी वधारून २२,१९४ वर उघडला. बँक निफ्टीमध्येही हीच परिस्थिती दिसून आली. बँक निफ्टी १३४ अंकांच्या वाढीसह ४८,४७८ वर उघडला. रुपया १४ पैशांनी मजबूत होऊन ८७.३६ डॉलर वर खुला झाला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर जवळपास सर्व निर्देशांकात आज तेजी दिसून येत आहे. केवळ निफ्टी फार्मा निर्देशांकात किंचित घसरण दिसून येत आहे.
महिंद्रा, अल्ट्राटेक, एल अँड टी, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. तर दुसरीकडे रिलायन्स, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
अमेरिकन बाजारात मोठी तेजी
शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली. डाऊ जोन्स ६०० अंकांनी वधारला, तर नॅसडॅक ३०० अंकांनी वधारला. या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही मोठी तेजी आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला जगातील 'क्रिप्टो कॅपिटल' बनवण्याची घोषणा केली असून 'यूएस क्रिप्टो रिझर्व्ह' स्थापन करण्याची योजना जाहीर केली. या बातमीनंतर बिटकॉइन आणि इतर डिजिटल करन्सी १० ते ३५ टक्क्यांनी वधारल्या.